

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलकांनी आझाद मैदानावर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी परिसरात चक्का जाम आंदोलन केले होते. तर सांताक्रूझ येथे बेस्ट बसमध्ये प्रवाशाला मारहाण केल्याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता मराठा आंदोलकांवर दाखल झालेले दोषारोपपत्र मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांकडून मोर्चे आंदोलने करणाऱ्यांवर ३० सप्टेंबर पर्यंत दोषारोपपत्र दाखल होतील, असे खटले मागे घेण्यात येणार आहेत. राज्य सरकारने याबाबत शुक्रवारी शासन निर्णय जारी केला आहे.
राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांच्याकडून सार्वजनिक हिताच्या व वेगवेगळ्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घेराव घालणे, मोर्चे काढणे, निदर्शने करणे इत्यादी स्वरुपाचे आंदोलनाचे हत्यार उपसतात त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कायद्याचे उल्लंघन केल्याने गुन्हे दाखल होऊन तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्रे दाखल केली जातात.
राजकीय व सामाजिक आंदोलनामुळे उद्भवलेल्या ज्या गुन्ह्यांमध्ये ३१ मार्च २०२५ पर्यंत दोषारोपपत्र दाखल झालेले आहेत, असे खटले मागे घेण्यास शासनाने याआधीच मान्यता दिली आहे. मात्र आता राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये ३० सप्टेंबर २०२५ पर्यत दोषारोपपत्रे दाखल होतील, असे खटले मागे घेण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आली.