मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत हजारो मराठा बांधव दाखल झाले आहेत. आंदोलकांची गैरसोय होऊ नये यासाठी एक मेसेज व्हॉट्स ॲपवर व्हायरल होत आहे.
यामध्ये आंदोलकांनी केवळ १० रुपयांचे रिटर्न तिकीट काढून रेल्वे स्थानकांतील पिण्याचे पाणी, शौचालया लाभ घेऊन दोन दिवस स्थानकात राहता येईल, असा सल्ला देण्यात आला आहे.
वाशी एक्झिबिशन सेंटरमध्ये ३० ते ४० हजार लोकांच्या राहण्याची, जेवणाची आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आल्याचे मेसेज व्हायरल झाले असून संघर्षयोद्धा मनोज जरांगे हा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार झाला आहे.
हजारोच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. शौचालय, पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने आंदोलकांची गैरसोय होत आहे. मुंबईत नवीन असलेल्या आंदोलकांच्या सोईसाठी काही समर्थकांनी विविध पर्याय सुचविले आहेत.
रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट घेण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद बंदर या मार्गावरील रिटर्न तिकीट काढण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे तिकीट केवळ १० रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि त्याची वैधता २४ तास आहे. म्हणजे ते खरेदी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत वापरता येते. अशा प्रकारे फक्त १० रुपयांमध्ये दोन दिवसांची राहण्याची सोय होते. या तिकीटद्वारे रेल्वे स्टेशनवरील शौचालये वापरण्याची मोफत सुविधा मिळू शकते. तसेच, तिथे पिण्यासाठी स्वच्छ पाणीही मोफत उपलब्ध होते, असा उल्लेखही मेसेजमध्ये करण्यात आला आहे. वाशी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या सिडको एक्झिबिशन सेंटर येथे मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. इथे ३० ते ४० हजार बांधवांसाठी राहण्याची, खाण्याची, पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर बरेच बांधवांची खाण्यापिण्याची अडचण भासू शकते. त्यामुळे मुंबई, नाशिक, पुणे, नवी मुंबईमधील बांधवांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आझाद मैदान परिसरातील हॉटेल्स बंद ठेवण्यात आली असली तरी या परिसरातील दवाखान्यातील कॅन्टीन बंद ठेवता येत नाहीत. जे बांधव अन्न आणि पाण्यासाठी अडचणीत आहेत, त्यांनी जवळच्या रुग्णालयांमधील कॅन्टीनचा वापर करावा, असाही सल्ला देण्यात आला आहे. यासाठी गुगल लोकेशनचा वापर करावा, असे आवाहनही या मेसेजमध्ये करण्यात आले आहे.