पाच दिवसांत १२८ टन कचरा! दक्षिण मुंबई झाली चकाचक

मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान दक्षिण मुंबईतून गेल्या पाच दिवसांत १२८ मेट्रिक टनांहून अधिक कचरा गोळा करण्यात आला. कचरा, अन्नपदार्थ आणि मिनरल वॉटरच्या बाटल्या हटवण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर काम केले. तर मुंबई पोलिसांच्या हाताळणीमुळे पाच दिवस चाललेले मराठा आंदोलन शांततेत पार पडल्याचे मानले जाते.
पाच दिवसांत १२८ टन कचरा! दक्षिण मुंबई झाली चकाचक
Published on

मुंबई : मुंबई महानगर पालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदानात २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत मराठा आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान ५ दिवसात पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने १२८ टन कचरा उचलला असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मंगळवारी उपोषण मागे घेतले. यानंतर, पालिका मुख्यालय, आझाद मैदान आणि सीएसएमटी स्थानक परिसरातील गर्दी रात्री ९ नंतर कमी झाली.

मंगळवारी आंदोलक निघून गेल्यानंतर, महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने या परिसरातून सुमारे १२८ मेट्रिक टन कचरा गोळा केला. यासाठी महापालिकेने मध्यरात्रीच स्वच्छता अभियान सुरू केले. सोमवारच्या रात्रीच्या शिफ्टमध्ये ४०० हून अधिक स्वच्छता कर्मचारी कामाला लागले. तर मंगळवारी सकाळपासून १,००० हून अधिक कर्मचारी आझाद मैदान परिसरात तैनात केले.

पाच दिवसाच्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत पालिकेकडून ६ मोठे कॉम्पॅक्टर, लहान ६ कॉम्पॅक्टर, कचरा वहन गाडी, प्रत्येकी दोन सक्शन आणि जेटींग संयंत्रे, १३ एससीव्ही, ५२ टॅंकर्स अशा ९६ वाहनांचा वापर दोन्ही सत्रांमध्ये करण्यात आला. आझाद मैदान आणि महानगरपालिका परिसर पालिका कर्मचाऱयांनी २ सप्टेंबर रात्रीपासून ३ सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत अविरतपणे स्वच्छता करून संपूर्ण परिसर पूर्ववत केला.

कचरा संकलनामध्ये मोर्चेकरी बांधवांचेही योगदान

मराठा आंदोलनादरम्यान स्वच्छता मोहिमेमध्ये सहकार्य करण्यासाठी मोर्चेकऱयांना बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला आंदोलनकर्त्या बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्वच्छता मोहिमेत हातभार लावला. या सहकार्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांचे आभार मानण्यात आले आहेत.

१ सप्टेंबर रोजी आयुक्त भूषण गगराणी यांनी आंदोलनकर्त्यांसोबत स्वच्छतेबाबत बैठक घेतली होती. जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यावर संध्याकाळी आंदोलक मैदानातून निघून गेले. मंगळवारी काही कार्यकर्त्यांनी उरलेले अन्न स्थानिकांना व पादचाऱ्यांना वाटण्याचा प्रयत्न केला, तरीही उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात अन्न मैदानात व परिसरात शिल्लक होते.

बीएमसीच्या पथकांनी रात्रीत रस्ते व आझाद मैदानाची स्वच्छता केली. एका मराठा कार्यकर्त्याने सांगितले की, “आम्ही साफसफाई केली असती. मात्र बाहेरगावचे आंदोलक निघून गेले होते आणि स्थानिक सदस्य गणेश विसर्जनामुळे व्यस्त होते.

पालिकेने केली एका रात्रीत मुंबई स्वच्छ...

मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर दक्षिण मुंबईतील आझाद मैदान व रस्त्यांवर उरलेला प्रचंड कचरा, अन्नपदार्थ आणि मिनरल वॉटरच्या बाटल्या हटवण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर काम केले.

पाच दिवसांच्या आंदोलनानंतर मंगळवारी आंदोलक मैदानातून निघून गेल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी राज्यभरातून आलेले उरलेले अन्न स्थानिक नागरिकांना व पादचाऱ्यांना वाटण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील रात्री उशिरापर्यंत मैदानात व बाहेरील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्न शिल्लक होते.

आझाद मैदानाच्या परिसरात मिनरल वॉटरच्या बाटल्यांचे ढीग पडलेले होते, तर काही लोक त्या गोळा करताना दिसले.

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, उरलेल्या बाटल्या मुंबईतील शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना वाटण्याचा त्यांचा मानस आहे. मंगळवारी रस्त्यांवर तुलनेने स्वच्छता दिसत होती. मात्र उरलेले ढीग अजूनही होते.

  • २९ ऑगस्ट रोजी - ४ टन

  • ३० ऑगस्ट रोजी - ७ टन

  • ३१ ऑगस्ट रोजी - ३० टन

  • १ सप्टेंबर रोजी- ३० टन

  • २ सप्टेंबर रोजी

  • ३० टन (पहिल्या सत्रात )

  • १२ मेट्रिक टन (दुसऱ्या सत्रात)

  • १५ मेट्रिक टन (तिसऱ्या सत्रात)

logo
marathi.freepressjournal.in