
मुंबई : आझाद मैदान आणि परिसरात स्वच्छता राखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांसह मराठा आंदोलकांचे हजारो हात पुढे सरसावले. महापालिकेने सोमवारी मध्यरात्रीपासून हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेत १००० हून अधिक कर्मचारी कार्यवाही करत होते. त्यांच्याबरोबरच मराठा आंदोलक मोठ्या संख्येने स्वच्छतेसाठी समोर आले होते.
मैदान आणि परिसरात स्वच्छता राखण्याकरिता सहकार्य करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलक बांधवसुद्धा कचरा संकलनासाठी सहकार्य करत आहेत. महानगरपालिका प्रशासनाकडून आझाद मैदान आणि परिसरात पाणी, वैद्यकीय सुविधा, शौचालये आदी सुविधा पुरवण्यात आल्या.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने आझाद मैदान, महानगरपालिका मुख्यालयासमोरील सेल्फी पॉइंट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याठिकाणी पथक तैनात करण्यात आले होते. यावेळी महानगरपालिकेच्या विविध प्रशासकीय (वॉर्ड) स्तरावरील यंत्रणा यात एकत्रितपणे सहभागी झाल्या आहेत. सुमारे १ हजाराहून अधिक स्वच्छता कर्मचारी तीन सत्रांमध्ये कार्यरत होते. यावेळी दोन मिनी कॉम्पॅक्टर आणि एका लार्ज कॉम्पॅक्टरचा वापर करण्यात आला. कचरा संकलनाची ५ लहान आकाराची वाहनेही कार्यरत होती. कचरा संकलनासाठी महानगरपालिकेने आंदोलनस्थळी २ हजार थैल्यांचे वितरण करण्यात आले होते. तसेच कचरा संकलनाच्या पेट्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आंदोलकांसाठी आझाद मैदान आणि परिसरात नियमित तसेच फिरती अशी दोन्ही प्रकारची मिळून ४५० पेक्षा अधिक शौचकूपे उपलब्ध आहेत. रात्रीच्या सत्रामध्ये सक्शन संयंत्राद्वारे तसेच जेट स्प्रे संयंत्रांचा वापर करून सर्व शौचकूपे स्वच्छ करण्यात आली.