.webp?rect=0%2C0%2C700%2C394&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.webp?rect=0%2C0%2C700%2C394&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांची होणारी गळचेपी थांबावी तसेच ठरवून बंद पाडत असलेल्या मराठी शाळा वाचवाव्या यासाठी मराठी अभ्यास केंद्राच्यावतीने गुरुवार १८ डिसेंबर रोजी मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यानंतरही मराठी अभ्यास केंद्र मोर्चा काढण्यावर ठाम असून सकाळी १०:३० वाजता हुतात्मा स्मारक येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करून पालिका मुख्यालय दिशेने मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.
मराठी अभ्यास केंद्राच्यावतीने रविवारी दादरच्या राजर्षी शाहू सभागृह येथे 'ठरवून बंद पाडलेल्या / पाडल्या जाणार्याद मराठी शाळांची परिषद' घेण्यात आली. या परिषदेत १८ डिसेंबर रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार अभ्यास केंद्राच्या वतीने मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी माता रमाबाई आंबेडकर नगर पोलिस ठाणे आणि आझाद मैदान पोलिस ठाणे यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र पोलिसांनी भारतीय दंडसंहिता कलम १६८चा आधार घेवून दोन्ही ठिकाणी मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसेच परवानगी नसताना मोर्चा काढल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा आदेशाचे पत्र मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार आणि सचिव आनंद भंडारे यांना पाठवले आहे.
मात्र मराठी शाळांच्या प्रश्नावर हुतात्म्यांना अभिवादन करून महापालिका मुख्यालयाकडे सनदशीर मार्गाने म्हणणे मांडण्यासाठी जाण्याचा निर्धार मराठी अभ्यास केंद्राने केला आहे. मोर्चा दरम्यान मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. शाळांच्या प्रकरणावर आयुक्तांचे लेखी स्पष्टीकरण मिळत नाही, तोवर महापालिकेच्या परिसरात बसून राहण्याचा निर्धार केंद्राने केला आहे.
मुंबई मराठी अध्यापक संघाचा पाठिंबा
मराठी अभ्यास केंद्रातर्फे काढण्यात येणाऱ्या मोर्चाला मुंबई मराठी अध्यापक संघाने पाठिंबा जाहीर केला आहे. मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचावे शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी मराठी अभ्यास केंद्र हुतात्मा चौक ते महापालिका असा मोर्चा काढणार असून या मोर्चात शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केले आहे.