
प्रसिद्ध विनोदी मालिका 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहचलेले विनोदवीर प्रभाकर मोरे (Prabhakar More) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. ते समाजकार्यात सक्रिय असून गेले अनेक दिवस राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्यांनी आज विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी प्रभाकर मोरेंवर २ मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. कोकण विभागाचे अध्यक्षपद आणि चित्रपट सांस्कृतिक विभागाची जबाबदारी प्रभाकर मोरेंवर सोपवण्यात आली आहे. पक्षप्रवेशाच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली.
यावेळी प्रभाकर मोरे म्हणाले की, "मला सर्वसामान्य कलाकारांसाठी चांगले काम करण्याची इच्छा आहे. तसेच, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे कलाकारांवर विशेष प्रेम आहे. अजितदादांच्या स्वभावामुळे मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे." अशा भावना व्यक्त केल्या. दरम्यान, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातून आपल्या खास कोकणी संवाद शैलीमुळे त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मुलाचे रत्नागिरीचे असलेले प्रभाकर मोरे हे गेली अनेक वर्ष मनोरंजन विश्वात काम करत आहेत. तर, त्यांनी अनेक मालिका, चित्रपट तसेच नाटक केली आहेत. आपल्या खास अभिनयाच्या शैलीमुळे ते मराठी मनोरंजन क्षेत्रात ओळखले जातात.