दोन लाख दुकानांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या झळकल्या

दुकानदारांनी ३० सप्टेंबरपर्यंत मराठी पाट्या न लावल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे
दोन लाख दुकानांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या झळकल्या
Published on

दुकानांच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे दिसतील, अशा मराठी पाट्या लावा; अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा मुंबई महापालिकेने दुकानदारांना दिला होता. पालिकेच्या इशाऱ्यानंतर पाच दुकानदारांपैकी दोन लाख दुकानांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या झळकल्या आहेत. मराठी पाट्या लावल्या की नाही, याचे सर्वेक्षण पालिकेने केले असता दोन लाख दुकानदारांनी अंमलबजावणी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, उर्वरित दुकानदारांनी ३० सप्टेंबरपर्यंत मराठी पाट्या न लावल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.

मुंबई मराठी माणसाची मुंबईत मराठी अनिवार्य तरीही दुकानांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या झळकत नव्हत्या. अखेर मुंबईतील दुकाने व आस्थापनांना मराठी पाट्या लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेने तयारी केली आहे; मात्र व्यापारी संघटनांकडून अंमलबजावणीसाठी मुदतवाढीची मागणी लावून धरण्यात आली होती. मराठी पाट्यांसाठी कलाकार उपलब्ध नसणे, तसेच मटेरिअल महागले असल्याची कारणे व्यापारी संघटनांकडून देण्यात आली. त्यामुळे कमी वेळात अंमलबजावणी होणे शक्य नसल्याने व्यापारी संघटनांनी मुदतवाढ देण्याची मागणी पालिकेकडे केली होती. महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांच्यासोबत व्यापाऱ्यांची बैठकही याबाबत झाली होती. या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या विविध व्यापारी संघटनांनी नामफलक सुधारणा करण्यास मुदतवाढ मिळण्यासाठी विनंती केली. या अनुषंगाने नामफलक सुधारणा करण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी मंजुरी दिली. यानुसार नामफलक सुधारणा करण्यास ३० सप्टेंबर २०२२पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत येत्या १५ दिवसांनंतर संपणार आहे; मात्र अजूनही फक्त दोन लाख दुकानदारांनी मराठी पाट्यांची अंमलबजावणी केली असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in