
भाईंंदर : मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषा बोलण्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व व्यापाऱ्यांत वादविवाद होऊन भांडण झाले होते, त्यात मनसे कार्यकर्त्यांनी उद्धट बोललेल्या व्यापाऱ्याचा कानाखाली मारली होती. त्यानंतर मीरा-भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी उडी घेत तो व्हिडीओ सोशल मीडियावर ट्विट करत मराठी विरुद्ध भाजप असा वाद सुरू केला आहे. तर याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात मनसेच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात भाजप प्रणित व्यापाऱ्यांनी बंदची हाक देत मोर्चाचे आयोजन करत मोर्चा काढला होता. तर मीरारोडमध्ये काही काळ मारवाडी व्यापाऱ्यांनी आपले दुकाने काही काळ बंद ठेवत मोर्चा काढला होता. याप्रकरणी सर्व मराठी संस्था, राजकीय पक्षांचे मराठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे एकत्र येत, शुक्रवारी ४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मीरा-भाईंदर पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
तर यावर बोलताना ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले की, भाजपला मराठी माणसांची एलर्जी आहे, त्यांना पूर्वीपासूनच त्यांचे मराठी माणसाविषयी बेगडी प्रेम आहे, तर आज काढलेला मोर्चा हा व्यापाऱ्यांचा नव्हता तर तो भारतीय जनता पार्टीचा होता, कारण त्यात व्यापारी कमी आणि नेते पदाधिकारी व कार्यकर्तेच जास्त होते. ठाण्यामध्ये परप्रांतीय पाच - दहा व्यापाऱ्यांनी मिळून मराठी व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे, तेंव्हा भाजप मुग गिळून गप्प बसली होती.तर यात मेहता यांना फक्त आग लावायची होती, म्हणून मीरा-भाईंदरचा व्हिडीओ ट्विट केला मात्र ठाण्याच्या व्हिडीओ बद्दल एक शब्द नाही बोलले किंवा तिथला व्हिडीओ ट्विट नाही केला. तर हा मोर्चा व्यापाऱ्यांचा नाही, हा मराठी माणसांच्या विरोधातील मोर्चा आहे. तर मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणूस नाही हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच; मत आहे. भाजपवाल्यांनी आपल्या फायद्यासाठी हा मोर्चा काढला आहे. मराठी माणसांना घरे नाकारली त्यांनी सोसायटीत परवानगी दिली नाही तेंव्हा भाजप काहीच बोलली नाही.
तर हे भाजपवाले फक्त मताचा फायदा असेल तिथे काम करत असतात. तर भाईंदरच्या स्विमिंग पूल मध्ये एक ११ वर्षाचा जैन मुलाचा मृत्यू झाला होता, तेंव्हा मात्र भाजपने आवाज उचलला नाही, तेंव्हा मनसेने आंदोलन केले त्यानंतर गुन्हा दाखल झाला होता हे विसरता कामा नये, असे सांगितले आहे.
मनसेचा जनआंदोलनाचा इशारा
मनसे सुद्धा एक मोठे जनआंदोलन करत मोर्चा काढणार आहे. त्यात भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी मीरा-भाईंदर शहरातील ज्या ज्या आगरी-कोळी स्थानिकांची फसवणूक करत जमिनी लाटल्या आहेत किंवा फसवणूक केली आहे, त्यांच्या विरोधात कारवाईसाठी आम्हीही मोर्चा काढणार आहोत. मराठीद्वेषी असलेला मोर्चा तर मराठी शिकण्यासाठी ७ जुलै रोजी पहिला क्लास मनसे मध्यवर्ती कार्यालय मीरारोड येथे होणार आहे.
मराठीसाठी मराठी एकीकरण समिती रस्त्यावर उतरणार
मीरा-भाईंदरमध्ये गुजराती, मारवाडी बिल्डरांकडून मराठी लोकांना घर नाकारणे, सतत मराठी द्वेषीपोटी मराठी भाषेवर अन्याय करणे. विशिष्ट समाजाचा उल्लेख करून शहरात वातावरण बिघडवणे याविरोधात मराठी बांधव खपवून घेणार नाहीत. याकरिता जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडूनच समाजाला पुढे करून तेढ वाढवणे, पोलिसांनी गुन्हा नोंदवूनही दुकाने बंद ठेवून जमाव करून पोलिसांवर दबाव आणणे यासंदर्भात सर्व मराठी संस्था, सर्व राजकीय पक्षांचे मराठी पदाधिकारी व कार्यकर्ते व बहुसंख्य मराठीजन हे शुक्रवारी ४ जुलै, सायंकाळी ६ वाजता मीरा-भाईंदरचे पोलीस उपायुक्त परिमंडळ १ कार्यालय येथे भेटणार आहेत, तर याबाबतीत एकत्र तर सर्वत्र, मराठी असाल तर उपस्थित राहा असे आवाहन करत मराठी एकीकरण समित, महाराष्ट्र राज्य हे पोलिसांना निवेदन देणार आहेत.