

भाईदर : मीरा-भाईंदर शहरात पुन्हा एकदा मराठी नागरिकाला घर भाड्याने देण्यास नकार दिल्याची घटना समोर आली असून, यामुळे संतापाची लाट उसळली आहे. सुरुवातीला घर भाड्याने देण्याची तयारी दर्शवून नंतर केवळ मराठी असल्याचे कारण देत घर नाकारल्याचा आरोप संबंधित घरमालकावर करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली तसेच संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर येथील रहिवासी रवीना शिंदे या स्वतःच्या कष्टाने 'शिंदे गुळाचा चहा आणि नाश्ता सेंटर' चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी भाड्याने घर घेण्यासाठी संपर्क साधला असता सुरुवातीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मात्र, नंतर त्या मराठी असल्याचे कारण देत घर देण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, मराठी नागरिकांशी भेदभाव करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित घरमालकाला घटनास्थळी बोलावून घेत त्याची कानउघाडणी केली. दरम्यान, या घटनेमुळे मीरा-भाईंदर परिसरात घरभाडे व्यवहारांमध्ये जात, भाषा किंवा समुदायाच्या आधारावर होणाऱ्या कथित भेदभावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मराठीशी तडजोड नाही
संबंधित घरमालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले. मराठी नागरिकांच्या सन्मानाशी आणि हक्कांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने स्थानिक नागरिकांचा सन्मान राखला पाहिजे, असे सांगितले. तसेच कोणत्याही प्रकारची दादागिरी, गुंडगिरी किंवा भेदभाव खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. भविष्यात अशा प्रकारच्या घटना समोर आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री