

मुंबई : अनेक वर्षांच्या दुराव्यानंतर ठाकरे बंधू राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मराठी मतांचे विभाजन थांबवण्यास निश्चितच मदत होईल, मात्र ही बहुप्रतिक्षित युती मुंबई महापालिकेच्या महत्त्वाच्या निवडणुकीत विजयाची हमी देऊ शकणार नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) बुधवारी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी औपचारिक युती जाहीर केली. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या पालिकेत २२७ नगरसेवकांची संख्या आहे.
येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले की, “मराठी माणूस” आणि महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही पक्षांनी हातमिळवणी केली आहे. मराठी भाषिक हा या दोन्ही पक्षांचा मुख्य मतदारवर्ग आहे.
२००५ मध्ये राज ठाकरे अविभाजित शिवसेनेतून बाहेर पडले आणि पुढील वर्षी मनसेची स्थापना केल्यानंतर प्रथमच या दोन पक्षांमध्ये निवडणूक युती होत आहे. त्यानंतर ठाकरे बंधू एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी राहिले होते.
ही युती अशा वेळी होत आहे की, २०२२ नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, राजकीय तुकडेबाजी आणि भाजपचे वाढते वर्चस्व यामुळे दोन्ही प्रादेशिक पक्ष अस्तित्वाच्या लढाईला सामोरे जात आहेत. अविभाजित शिवसेनेने भाजपला कनिष्ठ भागीदार ठेवून १९९७ ते २०२२ या २५ वर्षांत पालिकेत सत्ता राखली होती.
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. शिंदे सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षातून अनेक कार्यकर्ते व नेते शिंदे गटात आणि भाजपमध्ये गेले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना (उबाठा)ला २० जागा मिळाल्या. तर मनसेला एकही जागा मिळाली नाही.
यावेळी परिस्थिती वेगळी...
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी सांगितले की, शिवसेना (उबाठा) आणि मनसे युतीमुळे मराठी मतांचे विभाजन काही प्रमाणात थांबेल. २०१७ च्या पालिका निवडणुकीत अविभाजित शिवसेना आणि मनसेमधील मतविभागणीमुळे २० ते २५ प्रभागांत भाजपला फायदा झाला होता. यावेळी या प्रभागांतील परिस्थिती वेगळी असू शकते. २०१९ नंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपशी संबंध तोडून काँग्रेस आणि अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केल्यानंतर अल्पसंख्याक मते मिळू लागली, असे देशपांडे यांनी नमूद केले. मनसेसोबत युती केल्यामुळे शिवसेना (उबाठा) ला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे अल्पसंख्याक मते मिळतील का, हे पाहावे लागेल. काँग्रेसऐवजी मनसेची निवड करणे फायद्याचे ठरेल का, हाही सवाल आहे.
ठोस राजकीय संदेश देण्याची संधी गमावली!
शिवसेनेच्या इतिहासावर पुस्तक लिहिलेले ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी सांगितले की, या युतीमुळे मराठी मतांचे विभाजन टळेल. ते वार्षिक ७४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक अर्थसंकल्प असलेल्या मुंबई पालिकेची सत्ता ठरवताना अत्यंत महत्त्वाचे ठरते. मात्र, ज्या पत्रकार परिषदेत ही युती जाहीर झाली, तेथे सामायिक राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर जोरदार हल्ला न केल्याने ठाकरे बंधूंनी ठोस राजकीय संदेश देण्याची संधी गमावली, असेही त्यांनी नमूद केले. ती पत्रकार परिषद निवडणूक युती जाहीर करण्यापेक्षा कौटुंबिक पुनर्मिलनासारखी वाटली, असे अकोलकर राज आणि उद्धव यांच्या कुटुंबीयांनी एकत्र फोटोसेशन केल्याकडे लक्ष वेधत म्हणाले. ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे पालिकेतील विजय हमखास मिळेल असे नाही. सगळे काही मराठी माणूस कसा मतदान करतो यावर अवलंबून आहे. मुंबईतील मराठी माणूस भावनिक असून ठाकरे बंधूंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांशी, विशेषतः मराठी भाषेच्या प्राधान्याशी, तो जोडला जातो, असे त्यांनी सांगितले.