अरबी समुद्रात मार्कोसची थरारक कारवाई; अपहृत जहाजावरील १५ भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका

भारतीय नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी नौदलाला सागरी चाच्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
अरबी समुद्रात मार्कोसची थरारक कारवाई; अपहृत जहाजावरील १५ भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका

मुंबई : सोमालियाच्या किनाऱ्याजवळ अपहरण झालेल्या एमव्ही लीला नॉरफोक या मालवाहू जहाजावर भारतीय नौदलाच्या 'मार्कोस'नी (मरीन कमांडोज) धडक कारवाई करत जहाजावरील १५ भारतीय कर्मचाऱ्यांसह एकूण २१ जणांची सुटका केली. काही सशस्त्र हल्लेखोरांनी गुरुवारी या जहाजाचे अपहरण केले होते. मर्चंट व्हेसल (एमव्ही) लीला नॉरफोक या मालवाहू जहाजाची लायबेरिया या देशात नोंदणी झाली आहे. ते ब्राझीलमधील पोर्ट डू अको येथून बहरिनमधील खलिफा बिन सलमान या बंदराकडे प्रवास करत होते. प्रवासादरम्यान गुरुवारी अरबी समुद्रात सोमालियाच्या किनाऱ्यापासून साधारण ३०० सागरी मैलांवर असताना काही सशस्त्र हल्लेखोरांनी त्याचे अपहरण केले. या जहाजावर १५ भारतीय कर्मचारी होते. तसेच द युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स या पोर्टलला मदतीसाठी संदेश पाठवला. ही ब्रिटिश लष्करी संघटना असून सागरी वाहतुकीवर देखरेख करते. अपहरण झालेल्या जहाजासंबंधी माहिती मिळताच भारतीय नौदलाने अरबी समुद्रात मार्कोसची थरारक कारवाई

आयएनएस चेन्नई ही युद्धनौका, पी ८-आय प्रकारची दीर्घ पल्ल्याची सागरी गस्ती विमाने, हेलिकॉप्टर्स आणि प्रीडेटर एमक्यू ९- बी प्रकारचे ड्रोन्स एमव्ही लीला नॉरफोकच्या दिशेने रवाना केले. त्यांनी शुक्रवारी एमव्ही लीला नॉरफोकजवळ पोहोचून भारतीय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. कर्मचाऱ्यांनी जहाजाच्या स्ट्राँगरूममध्ये राहून जहाजाचे संचालन सुरू ठेवले आहे आणि ते सर्वजण सुखरूप आहेत, अशी माहिती नौदलाला मिळाली. त्यानंतर नौदलाने अपहृत जहाजाचा पाठलाग सुरू ठेवत त्यावर कमांडो उतरवण्याची तयारी केली.

जहाजाजवळ जाऊन 'मार्कोस'नी अपहरणकर्त्यांना तातडीने जहाज सोडून जाण्यास फर्मावले. त्यानंतर कमांडो जहाजावर उतरले आणि अपहरणकर्त्यांचा शोध घेतला. मात्र, जहाजावर हल्लेखोर सापडले नाहीत. कदाचित, नौदलाने दिलेल्या गंभीर इशाऱ्यानंतर अपहरणकर्ते पळून गेले असावेत, असा अंदाज लावला जात आहे. कमांडो कारवाईत १५ भारतीय कर्मचाऱ्यांसह २१ जणांची सुटका करण्यात आली

नौदलप्रमुखांचे कठोर कारवाईचे आदेश

भारतीय नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी नौदलाला सागरी चाच्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांत अरबी समुद्र आणि तांबड्या समुद्रात भारतीय आणि इस्रायलच्या मालवाहू जहाजांवरील हल्ले वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नौदलाने चार युद्धनौका, टेहळणी विमाने, हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन्स या प्रदेशात तैनात केले असून बंडखोर आणि चाच्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश नौदलप्रमुखांनी दिले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in