मरीन ड्राईव्ह ते वांद्रे-वरळी सी-लिंक प्रवास १२ मिनिटांत; २००० मेट्रिक टन वजनाचे गर्डर आज बसवणार; वाचा सविस्तर

गर्डर जोडणीनंतर कोस्टल रोड वरळी येथे सी-लिंकला जोडला जाणार आहे. त्यामुळे वांद्र्याहून दक्षिण मुंबईत थेट प्रवास करता येणार आहे.
मरीन ड्राईव्ह ते वांद्रे-वरळी सी-लिंक प्रवास १२ मिनिटांत; २००० मेट्रिक टन वजनाचे गर्डर आज बसवणार; वाचा सविस्तर
छायाचित्र सौजन्य - सलमान अन्सारी

मुंबई : चार बोइंग जेट विमानांच्या वजनाइतका १३६ मीटर लांब, दोन हजार मेट्रिक टन वजनाचा १८ ते २१ मीटर रुंद 'बो स्ट्रिंग आर्च महाकाय गर्डर' शुक्रवारी पहाटे नरिमन पॉइंटच्या दिशेला बसवण्यात येणार आहे. दरम्यान, गर्डर लाँच केल्यानंतर वरळी-वांद्रे सी-लिंक कोस्टल रोडला जोडला जाणार असून पुढील काही दिवसांत मरीन ड्राईव्ह ते वरळी-वांद्रे सी-लिंक दरम्यानचा पाऊण तासाचा प्रवास फक्त १२ मिनिटांत करता येणार आहे. दरम्यान, दुसरा ‘बो स्ट्रिंग आर्च गर्डर’ मेअखेरपर्यंत बसवण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोडचे ८८ टक्के काम पूर्ण झाले आहे. कोस्टल रोड प्रकल्पातील दक्षिण मुंबईतील वरळी ते मरीन ड्राईव्हदरम्यान एक लेन ११ मार्चपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. मे अखेरपर्यंत संपूर्ण कोस्टल रोड मुंबईच्या सेवेत आणण्याचे नियोजन असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, कोस्टल रोड प्रकल्पातील महत्त्वपूर्ण टप्पा वरळी-वांद्रे सी-लिंकला जोडला जाणार आहे. दोन हजार मेट्रिक टन वजनाचा १३६ मीटर लांब गर्डर शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांत बसवण्यात येणार आहे. फुटबॉल मैदानाच्या आकाराचा गर्डर न्हावाशेवा बंदरातून रवाना होत कोस्टल रोड प्रकल्प स्थळी दाखल झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ सागरी मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून एकूण ८८ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा १०.५८ किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे, तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा ४.५ किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंक जोडला जाणार आहे. या प्रकल्पातील १३६ मीटरच्या सर्वात मोठ्या ‘बो स्ट्रिंग आर्च गर्डर’ची बांधणी रायगड जिल्ह्यातील न्हावा येथे करण्यात आली आहे. हा महाकाय गर्डर न्हावा जेट्टीवरून बार्जमध्ये टाकून वरळी येथे आणला गेला आहे.

गर्डर जोडणीनंतर कोस्टल रोड वरळी येथे सी-लिंकला जोडला जाणार आहे. त्यामुळे लवकरच वांद्र्याहून दक्षिण मुंबईत थेट प्रवास करता येणार आहे. यामुळे दक्षिण मुंबई, पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडी कमी होईल. सध्या १२ मार्चपासून कोस्टल रोडच्या ९ किमी मार्गावर तीन लेनच्या एका मार्गिकेने वरळी ते मरीन ड्राइव्ह असा प्रवास करता येत आहे.

७० टक्के वेळ व ३४ टक्के इंधनाची होणार बचत

यामुळे मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सी-लिंकपर्यंत सिग्नलमुक्त, करमुक्त वेगवान प्रवास होणार आहे. यात वेळेची ७० टक्के आणि इंधनाची बचत ३४ टक्के होणार आहे. पर्यायाने वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, कार्बन उत्सर्जन कमी होणार असल्याने पर्यावरण संवर्धनासाठी फायदा होणार आहे.

असे होणार काम

कोस्टल रोड वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी पिलर ७ व पिलर ९ च्या मध्ये हा गर्डर बसवण्यात येणार आहे. हा गर्डर बसवणे कोस्टल रोड प्रकल्पातील सर्वाधिक आव्हानात्मक काम आहे. अरबी समुद्रात भरती व ओहोटीचा अंदाज घेऊन हा गर्डर बसवण्यात येणार आहे. शुक्रवारी पहाटे ४ ते सकाळी ७ या वेळेत हा गर्डर बसवण्यात येणार आहे.

१०० वर्षांची गॅरंटी

गर्डरला जपानी तंत्रज्ञानाने कोटिंग करण्यात आले असून पुढील २५ ते ३० वर्षें गंज पकडणार नाही. तसेच तो पुढील १०० वर्षें टिकेल, इतका मजबूत आहे.

भरती-ओहोटीत चॅलेंजिंग काम

‘बो आर्च गर्डर’ उलवे येथून समुद्र मार्गी आणण्यात येणार आहे. परंतु, पिलरवर गर्डर लाँच करणे हे समुद्रातील भरती व ओहोटीदरम्यान आव्हानात्मक काम असणार आहे.

दुसरा ‘बो स्ट्रिंग आर्च गर्डर’ मे अखेरपर्यंत लाँच

मुंबई कोस्टल मार्गावरून वांद्रे-वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या मार्गावर २५ हजार मेट्रिक टन वजनाचा दुसरा गर्डर मे अखेरपर्यंत लाँच करण्यात येणार आहे. हा दुसरा गर्डर १४३ मीटर लांब आणि २६ ते २९ मीटर रुंद आहे. ही तुळई स्थापन केल्यानंतर मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू पूर्णपणे जोडले जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in