मरिन ड्राइव्हला मिळणार आता आणखी झळाळी

विविध प्रकारची झाडे-झुडपे आणि कारंजे यामुळे या भागाला फ्लोरा फाउंटन म्हणून ओळखले जाते
मरिन ड्राइव्हला मिळणार आता आणखी झळाळी

मुंबई : आगामी काळात दक्षिण मुंबईचे रुपडे बदलणार आहे. नवीन पर्यटनस्थळे, विविध प्रकल्प, सुशोभीकरण, जुन्या बेस्ट बसचा पर्यटनासाठी वापर, तलावांचे सुशोभीकरण अशा योजना मुंबईच्या दोन्ही पालकमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केल्या आहेत. त्यातील काही योजना प्रत्यक्षात आकारास आणण्याकरिता प्रशासनाने काम सुरू केले आहे. मरिन ड्राइव्ह आणि हुतात्मा चौक (पूर्वीचे फ्लोरा फाउंटन) ते एशियाटिक लायब्ररीपर्यंतच्या भागाचा विकास केला जाणार आहे. या दोन्ही स्थळांचा कायापालट करताना त्यांचा हेरिटेज दर्जा जपला जाणार आहे.

मरिन ड्राइव्ह अर्थात क्वीन्स नेकलेस हा मुंबईकरांच्या गळ्यातील ताईत मानला जातो. असंख्य मुंबईकर दररोज या ठिकाणी येत असतात. इथला सूर्यास्त पाहण्यासाठी तोबा गर्दी असते. त्यामुळे अनेकदा इथल्या कठड्यावर बसायलाही जागा नसते. त्यामुळेच मरिन ड्राइव्हचे सुशोभीकरण करण्याची योजना आखण्यात आली आहे. या परिसराचा विकास करताना हेरिटेज दर्जाला धोका न लावता काम केले जाणार असून त्यासाठी महापालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली आहे.

विविध प्रकारची झाडे-झुडपे आणि कारंजे यामुळे या भागाला फ्लोरा फाउंटन म्हणून ओळखले जाते. संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाची आठवण आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी त्याचे नामकरण हुतात्मा चौक स्मारक असे करण्यात आले. हा परिसर हुतात्म्यांची सदैव आठवण करून देणारा आहे. विकास करताना हुतात्मा चौकाच्या मागील बाजूच्या एशियाटिक लायब्ररीकडे जाणाऱ्या रस्त्याचे सुशोभीकरण केले जाईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in