मस्जिद बंदर येथील इमारतीत अग्निकल्लोळ; दोन महिलांचा मृत्यू, ५ जखमी

इमारतीच्या तळमजल्यावरील इलेक्ट्रिक मीटर बॉक्समध्ये रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे इमारतीत धुराचे लोण पसरल्याने इमारतीतील काही रहिवासी वरील मजल्यावर अडकले.
मस्जिद बंदर येथील इमारतीत अग्निकल्लोळ; दोन महिलांचा मृत्यू, ५ जखमी
छायाचित्र : विजय गोहिल
Published on

मुंबई : मस्जिद बंदर इसाजी स्ट्रीट येथील पन्न अल्ली मेन्शन ही तळ अधिक ११ मजली इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावरील इलेक्ट्रिक मीटर बॉक्समध्ये रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे इमारतीत धुराचे लोण पसरल्याने इमारतीतील काही रहिवासी वरील मजल्यावर अडकले. या घटनेत साजीया आलम शेख (३०) व सबीला खातून शेख (४२ ) या दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले व अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

मस्जिद बंदर, राम मंदिरजवळ, वडगडी येथील इसाजी स्ट्रीट ४१/४३ पन्न अल्ली मेन्शन ही ११ मजली हायराईज इमारत आहे. ही इमारत म्हाडाची उपकरप्राप्त इमारत असून ती ४० ते ५० वर्षें जुनी आहे. रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास इमारतीतील तळमजल्यावर असलेल्या इलेक्ट्रीक मीटर बॉक्समध्ये आग लागली. काही वेळातच आगीमुळे इमारतीत धुराचे लोण पसरले. आग लागल्याचे वृत्त पसरताच इमारतीतील रहिवाशांनी घराबाहेर पडत खाली येण्याचा प्रयत्न केला. मात्र, इमारतीच्या वरील मजल्यावर धुराचे लोण पसरले आणि रहिवासी पहिल्या, सहाव्या व आठव्या मजल्यावर अडकले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी वरील मजल्यावर धाव घेत अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढले. पहिल्या मजल्यावरील पॅसेजमध्ये अडकलेल्या दोन महिलांच्या हाताला आणि पायांना दुखापत झाली, धुरामुळे त्रास झाल्याने दोन्ही महिलांना पोलीस व्हॅन मधून जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान साजीया आलम शेख (३०) व सबीला खातून शेख (४२) या दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, शाहीन आलम शेख (२२), अदील शेख (२४) यांना उपचारासाठी दाखल केले असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. तर नक्की श्रूत (२४) व साऊदा आलम शेख (४८) या दोघांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अग्निशमन दलाची इमारतीला नोटीस

दरम्यान, इमारतीतील फायर फायटिंग सिस्टम कार्यान्वित नसल्याने नोटीस बजावण्यात येणार असल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in