मुंबईसह आजूबाजूच्या शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने कंबर कसली

सध्या राज्यात ४,५८७ सक्रिय रुग्ण असून १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण मुंबई, पुणे, ठाणे जिल्ह्यात
मुंबईसह आजूबाजूच्या शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने कंबर कसली

कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढल्याने देशभरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईसह आजूबाजूच्या शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने कंबर कसली आहे. सोमवार १० एप्रिल रोजी मुंबई महानगरपालिकेने तब्बल ३ वर्षानंतर महापालिका आणि शासकीय रुग्णलयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसह प्रत्येकाला मास्क सक्ती लागू केली आहे. या निर्णयानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून प्रतिदिन कोट्यवधी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या उपनगरीय रेल्वेमध्ये देखील मास्क सक्ती लागू होणार का? याबाबत चर्चाना उधाण आले आहे. रेल्वेद्वारे अनेक शहरे जोडली गेली असून कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने कोरोनाबाबबत जनजागृती आणि मास्क सक्तीच्या निर्णयाबाबत तात्काळ विचार करावा असे मत रेल्वे प्रवासी संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.         

     सध्या राज्यात ४,५८७ सक्रिय रुग्ण असून १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण मुंबई, पुणे, ठाणे जिल्ह्यात आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका अँक्शन मोड मध्ये आली आहे. फेब्रुवारी मध्यापासून कोरोना बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रोज तीन अंकी रुग्ण आढळत आहे. एप्रिल व मे महिन्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढ होण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. खबरदारी म्हणून १० एप्रिल रोजी मुंबई महापालिकेसह शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांसह ये-जा करणाऱ्या प्रत्येकाला मास्क सक्ती करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वाचे अस्त्र म्हणून चेहऱ्यावरील मुखपट्टी म्हणजेच मास्क अनिवार्य आहे. मात्र उपनगरीय रेल्वेने दैनंदिन प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांबाबत केंद्र तसेच राज्य सरकारने कोणतीही नियमावली जाहीर केलेली नाही. सर्वाधिक गर्दीच्या रेल्वेद्वारे अनेक शहरे जोडली गेली आहेत. वेळीच जनजागृती झाली नाही अथवा मास्क सक्तीबाबत निर्णय झाला नाही तर रेल्वेद्वारे कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रसार होऊ शकतो हे नाकारता येणार नाही.    

रेल्वे स्थानकांवर अँटीजन चाचण्या सुरु करा 

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची स्थानकावर अँटीजन चाचणी करण्यात येत होती. सुरुवातीला प्रतिदिन रेल्वे स्थानकांवर ५५० ते ७५० चाचण्या केल्या जात होत्या. ती संख्या काही महिन्यांपूर्वी निम्म्यावर येत या चाचण्या पूर्ण बंद करण्यात आल्या. मात्र मागील महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रसार पुन्हा वाढू लागल्याने भीती व्यक्त केली जात आहे. या भितीमुळे रेल्वे प्रशासनाने खबरदारी कोरोना जनजागृती तसेच स्थानकांवरील अँटीजन चाचण्या पुन्हा सुरु करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे. 

अद्याप मास्क सक्ती करण्याबाबतच्या कोणत्याही सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या नाहीत. सूचना येताच आवश्यक उपाययोजना राबवण्यात येतील. 

- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

मुंबईची लाईफलाईन असलेल्या उपनगरीय रेल्वेमधून प्रतिदिन सव्वा कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. कोरोना संक्रमणाबाबत वेळीच काळजी घेतली गेली नाही तर या विषाणूचा वेगाने प्रसार होऊ शकतो. प्राथमिक स्वरूपात रेल्वे प्रशासनाने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक जनजागृती, टप्प्याटप्प्याने मास्क सक्तीचा तसेच स्थानकांवरील अँटीजन चाचण्यांचा निर्णय घ्यावा, 

- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद 

logo
marathi.freepressjournal.in