तूर्तास मास्कसक्ती नाही! माजी टास्क फोर्स सदस्य डॉ. राहुल पंडित यांची माहिती

डेल्टा व्हेरिएंटपेक्षा बीएफ ७ व एक्सबीबी व्हेरिएंटचा प्रभाव कमीच
तूर्तास मास्कसक्ती नाही! माजी टास्क फोर्स सदस्य डॉ. राहुल पंडित यांची माहिती

बीएफ ७ व एक्सबीबी व्हेरिएंटचा शिरकाव भारतात झाला असला, तरी डेल्टा व्हेरिएंटपेक्षा नवीन व्हेरिएंटचा प्रभाव कमीच आहे. तसेच मुंबईसह भारतात लसीकरण झाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे. त्यामुळे लहान मुलांनाही नवीन व्हेरिएंटचा धोका कमीच असल्याने तूर्तास मास्कसक्ती नाहीच, असे मत टास्क फोर्सचे माजी सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी दैनिक ‘नवशक्ति’शी बोलताना व्यक्त केले.

चीन, जपान, हाँगकाँग, साऊथ कोरिया, सिंगापूर, थायलँड या देशांत बीएफ ७ व एक्सबीबी १.५ विषाणूने थैमान घातले असून, संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. भारतातील गुजरात व ओडिसात बीएफ ७ चे रुग्ण आढळले असून, गुजरातमध्ये एक्सबीबी १.५ चे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेसह राज्य सरकार अलर्ट झाले असून, विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. परंतु मुंबईसह राज्यात लाभार्थ्यांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. तसेच बुस्टर डोसही घेतला आहे. त्यामुळे मुंबईत दोन्ही व्हेरिएंटचा तितकासा धोका नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटचा शिरकाव झाला होता, मात्र मुंबईकरांचे लसीकरण झाल्याने मुंबईला नवीन व्हेरिएंटचा धोका नाही. त्यामुळे तूर्तास मास्कसक्ती नाही, असे डॉ. राहुल पंडित म्हणाले.

मुंबईकर सुज्ञानी!

बीएफ ७ व एक्सबीबी १.५ व्हेरिएंट मुलांना त्रासदायक नाही. डेल्टा व्हेरिएंटचा शिरकाव झाला त्यावेळी लहान मुले जास्त बाधित झाली नाहीत. त्यामुळे लहान मुलांना नवीन व्हेरिएंटचा धोका कमीच आहे, असे पंडित यांनी सांगितले. कोरोनाचा मार्च २०२० मध्ये शिरकाव झाला त्यावेळी कोरोना विषाणू काय हे कोणालाच माहीत नव्हते. त्यानंतर जगभरातील तज्ज्ञांनी अभ्यास करत कोरोनावर लस उपलब्ध केली. परंतु कोरोना काळात मास्कसक्ती केल्यावर प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळे मास्क एक सवयीचा भाग झाला असून, आजही अनेक जण मास्कचा वापर स्वतः हून करतात. त्यामुळे तूर्तास तरी मास्कसक्ती नाही, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in