ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग

मुंबईतील जोगेश्वरी-ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये मंगळवारी भीषण आग लागल्याची घटना घडली.
ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग
Published on

मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी-ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये मंगळवारी भीषण आग लागल्याची घटना घडली. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने तारांबळ उडाली. या आगीच्या भक्ष्यस्थानी १५० हून अधिक दुकाने आणि गोदामे आली आहेत. ओशिवरा फर्निचर हे मुंबईतील सर्वात मोठे मार्केट असून गेल्या महिनाभरातील आग लागण्याची ही दुसरी घटना आहे.

अंधेरी पश्चिमेला असलेल्या ओशिवरा येथे मुंबईतील फर्निचरचे मोठे मार्केट आहे. या ठिकाणी मोठ्या दुकानासह लाकडाची गोदामेदेखील आहेत. सकाळी ११ च्या सुमारास लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे परिसरात सर्वत्र आगीचे लोळ पाहायला मिळत होते. तसेच आकाशात पसरलेल्या धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या, सहा जम्बो टँकर, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी माहिती मिळताच दाखल झाले होते. आगीने रौद्ररूप धारण केल्याने अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, आगीने १५० हून अधिक फर्निचर दुकानांना कवेत घेतले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. दरम्यान, सदर आग सिलिंडर स्फोटामुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर अग्निशमन दलाच्या वतीने या आगीला लेव्हल-२ घोषित करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in