मुंबई : गोरेगाव पूर्व येथील रहेजा इमारत परिसरात असलेल्या खडकपाडा फर्निचर मार्केटमध्ये शनिवारी सकाळी 11.15 च्या सुमारास भीषण आग लागली. लाकडी वस्तूचे सामान असलेल्या पाच ते सहा गाळ्यांना आग लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. तब्बल दोन हजार चौरस मीटर परिसरात ही आग पसरली होती. या आगीवर तब्बल सहा तासांनी नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत तब्बल 70 ते 80 दुकाने जळून खाक झाल्याचे समजते.
गोरेगाव पूर्वेकडे दिंडोशी हद्दीत असलेल्या रहेजा इमारत परिसरात खडकपाडा येथील फर्निचर मार्केटमध्ये सकाळी अचानक मोठी आग लागली. आगीमुळे आसपासच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. घटनास्थळी अग्निशमन दलाचा ताफा आग विझवण्याचे काम करत आहे. आठ फायर इंजिन, पाण्याचे पाच ट्रँकर घटनास्थळी असून आगीची तीव्रता वाढल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले आहे.
एका गोदामाला लागलेली ही आग आजुबाजूला पसरत गेली आणि या आगीने रौद्ररूप धारण केले होते. ही आग वेगाने पसरल्यामुळे आकाशात काळ्या धुराचे प्रचंड लोट उठले होते. आगीमध्ये आपल्या दुकानातील सामान जळू नये म्हणून काहींनी दुकाने रिकामी केली असून सर्व सामान रस्त्यावरती आणून ठेवले आहे. यामुळे संपूर्ण मार्ग बंद करण्यात आला आहे. बागेश्वरी ते आयटी पार्कला जाणारा मुख्य मार्ग चार तासांपासून अधिक काळ बंद ठेवण्यात आला होता.
या आगीत लाकडी सामान, प्लास्टिक, थर्माकोल, प्लायवूड, भंगार सामान आदी मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले. अग्निशमन दलाने सकाळी 11.18 वाजताच्या सुमारास आगीसाठी श्रेणी-1 ची वर्दी दिली होती. मात्र आगीची तीव्रता वाढताच 11.24 वाजता आगीची श्रेणी क्रमांक-2 ची वर्दी देण्यात आली. क्षणाक्षणाला आग अक्राळविक्राळ रूप धारण करत होती. अग्निशमन दलाने अखेर 11.48 च्या सुमारास श्रेणी-3 ची वर्दी दिली. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. दरम्यान, सहा तासांच्या अथक प्रयत्नाने अग्निशमक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.