
मुंबई आग लागण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशातच आता मुंबईत दादरमधील कोहिनूर स्क्वेअर इमारतीमध्ये मुंबई महापालिकेच्या पार्किंगमध्ये आज मध्यरात्री मोठी आग लागली होती. ही आग चौथ्या मजल्यावर लागली होती. या आगीत 16 ते 17 गाड्या जळून पूर्णतः खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्यांच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
सध्या तिथं फायर कूलिंगचं काम सुरु आहे. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. कंत्राटदाराकडून नियमांचं उल्लंघन करुन गाड्यांची पार्किंग केली जाते. त्यामुळेच ही आग लागली आहे. असा आरोप स्थानिकांनी केला आहे. नक्की ही आग कशामुळे लागली याचा तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.
मुंबईत शिवाजी पार्क परिसरात असलेली कोहिनूर स्क्वेअर इमारत तशी वर्दळीच्या ठिकाणी आहे. दादर पश्चिमेत शिवसेना भवन समोरच ही कोहिनूर इमारत आहे. आज मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास कोहिनूर इमारतीमध्ये मुंबई महानगरपालिकेचा पार्किंग लॉट आहे. या पार्किंगमध्ये चौथ्या मजल्यावर ही मोठी आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमनदल ताबडतोब घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल एक तासात संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनदलास यश आलं आहे. सध्या कोहिनूर स्क्वेअरमध्ये फायर कुलिंगचं काम सुरू आहे. .