तारापूर MIDC मध्ये भीषण वायुगळती; नागरिकांची पळापळ, अनेकांना श्वसनाचा त्रास

एमआयडीसीमधील तारापूर भघेरिया इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये भीषण वायू गळती झाली आहे. या विषारी धुरामुळे कामगारांना श्वसनाचा त्रास आणि डोळ्यांची जळजळ होत असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. वायुगळतीमुळे नागरिकांची पळापळ झाली असून अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे.
तारापूर MIDC मध्ये भीषण वायुगळती; नागरिकांची पळापळ, अनेकांना श्वसनाचा त्रास
तारापूर MIDC मध्ये भीषण वायुगळती; नागरिकांची पळापळ, अनेकांना श्वसनाचा त्रास
Published on

पालघर : एमआयडीसीमधील तारापूर भघेरिया इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये भीषण वायू गळती झाली आहे. या विषारी धुरामुळे कामगारांना श्वसनाचा त्रास आणि डोळ्यांची जळजळ होत असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. वायुगळतीमुळे नागरिकांची पळापळ झाली असून अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे.

तारापूर एमआयडीसीमधील 'डी-झोन' परिसरात असलेल्या भघेरिया केमिकल्स (पूर्वीचे झेनित केमिकल्स) या कंपनीत सोमवारी दुपारी भीषण वायू गळती झाल्याची घटना घडली. ओलियम वायूची गळती झाल्याने संपूर्ण परिसरात घबराट पसरली असून, सुमारे दीड किलोमीटर अंतरापर्यंत या वायूचा परिणाम जाणवत आहे. यामुळे अनेक कामगार आणि स्थानिक नागरिकांना श्वसनाचा त्रास तसेच डोळ्यांच्या जळजळीचा सामना करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी २ च्या सुमारास भघेरिया केमिकल्समधील ओलियमचा साठा असलेल्या टँक किंवा यंत्रणेतून गळती सुरू झाली. हा वायू अत्यंत जहाल असून तो हवेच्या संपर्कात येताच त्याचे रूपांतर सल्फर डाय ऑक्साईड आणि इतर सल्फरस ऑक्साईड्समध्ये झाले. यामुळे परिसरात धुराचे लोट पसरल्याचे पाहायला मिळाले.

वाऱ्याच्या दिशेमुळे व्याप्ती वाढली

ज्या वेळी गळती झाली, त्या वेळी वाऱ्याचा वेग पश्चिमेकडून पूर्वेकडे होता. परिणामी, हा विषारी वायू वाऱ्यासोबत वेगाने वाहत गेला. औद्योगिक वसाहतीतील इतर कंपन्यांमधील कामगार आणि जवळच असलेल्या रहिवासी वस्त्यांमधील नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. साधारण दीड ते दोन किमीच्या परिघात या वायूची तीव्रता जाणवत आहे.

गळती रोखण्याचे प्रयत्न

घटनेची माहिती मिळताच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. गळती रोखण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील इतर कंपन्यांमधील काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in