रमेश औताडे/मुंबई
मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा तुमच्यासाठी फार काही करू शकलो नाही. पहिल्यांदा जगाला संकटात टाकणारा कोरोना आला. त्यानंतर माझे ऑपरेशन झाले. त्यातून बरा होतो, तर यांनी गद्दारी करून सरकारच पाडले. माझे सरकार असते तर तुम्हाला इथे यावेच लागले नसते, हा माझा शब्द आहे. या सरकारला जाहिरातींवर कोट्यवधी उडवायला पैसे आहेत, पण देशाला घडविण्यास मदत करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना देण्यास पैसे नाहीत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली.
राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा, यासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मुंबईत आझान मैदानावर मोर्चा काढला होता. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मी येथे नेता म्हणून नाही, तर तुमचा भाऊ या नात्याने आलो आहे. तुम्ही देशाची सेवा करता. आता हात टाळ्यांसाठी आपटले तर इतका आवाज येतो, हेच जर सरकारच्या कानाखाली आपटले तर किती आवाज येईल. मी मुख्यमंत्री असताना काही करू शकलो नाही. कारण त्या काळात जग कोरोनाचा सामना करत होते. यात पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझे नाव होते, ते तुमच्या मेहनतीमुळे. डिसेंबरपासून तुमचा लढा सुरू आहे, पण सरकार ऐकत नाही. पुढच्या अधिवेशनात निर्णय घेऊ, असे मंत्री सांगतात. पण, पुढच्या अधिवेशनापर्यंत तुमचे सरकार टिकणार का.’’
ठाकरे म्हणाले, ‘‘कोरोनाचे संकट थोडे टळले तर माझे ऑपरेशन झाले. त्यातून उभा राहतोय तर यांनी सरकार पाडले. सरकार असते तर तुम्हाला इथे यावेच लागले नसते, हा माझा शब्द आहे. तुमची सेवा सरकारला कळतच नाही. केवळ जाहीराती बघायच्या. त्यात गुटगुटीत मंत्री दिसतात. आरोग्यमंत्री सुदृढ असतील. पण, तो काही भारत नाही. अनेक कुपोषित बालके आहेत. माता पण कुपोषित आहेत. त्यांची सेवा तुम्ही करता. ग्रामीण भागात तर आयुष्याचा श्रीगणेशा आंगणवाडीच्या शाळेत होतो. खरा भारत घडविणारी शक्ती तुम्ही आहात,’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नेते एम ए पाटील म्हणाले, ‘‘आम्ही आंदोलन करायचे व सरकारने आश्वासन द्यायचे, असे अजून किती वर्ष चालणार? महिलांना असे आंदोलन करायला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. ग्रॅज्युईटी द्यावी, शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, मानधन वाढवावे, निवृत्तिवेतन मिळावे, मोबाइल द्यावा, या व इतर प्रलंबीत मागण्यांसाठी राज्यभर बेमुदत संप सुरू असताना सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करावे आणि अंगणवाडी केंद्र ताब्यात घ्यावे, अशी भूमिका घेतली आहे.’’
‘‘आम्ही गुन्हेगार नाही. पोटासाठी काम करत आहोत. आम्हाला सेवेतून कमी करणार असाल तर त्याचा निषेध राज्यभर वेगळ्या पद्धतीने होईल. महिला शक्तीला कमी लेखू नका,’’ असा इशारा अंगणवाडी जेष्ठ कार्यकर्त्या शुभा शमीम यांनी यावेळी दिला. ‘‘महिनाभर सुरू असणाऱ्या संपाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सरकारमध्ये महिला आमदार, विविध राजकीय पक्ष महिला पदाधिकारी, महिला आयोग, महिला दक्षता समिती असे अनेक प्रकारे महिलांच्या विकासासाठी प्रयत्न होत असताना आम्हाला न्याय का मिळत नाही? अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या सर्वच संपात सहभागी झाल्याने राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्र बंद असताना सरकार गंभीर का नाही,’’ असे अनेक सवाल यावेळी संगीता कांबळे व आर माय टी इराणी यांनी केला. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, खा.अरविंद सावंत उपस्थित होते.
पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. महिला पोलिस मोठ्या प्रमाणात होत्या. जागे अभावी मैदानाबाहेरही अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. फूटपाथवर बसून गावावरून आणलेल्या भाकरी खात असणाऱ्या या महिला सरकारच्या नावाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत होत्या.
जाहिरातीवर कोट्यवधींचा खर्च
देशभर रेल्वेस्थानकावर सेल्फी पॉईंट तयार केले. त्यात पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी फोटो काढता येतो. एका सेल्फी पॉईंटला साडेसहा लाखांचा खर्च केला आहे. सरकारच्या जाहिरातीचे पैसे जनता भरते, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
रामाच्या दर्शनाला आमंत्रणाची गरज नाही
राममंदिरात जाणार आहेच पण त्यासाठी कोणाच्या आमंत्रणाची गरज नाही. याआधी जसा गेलो तसाच मी मला वाटेल तेव्हा रामाच्या दर्शनाला जाईन. राममंदिर ही कोणा पक्षाची खासगी प्रॉपर्टी नाही, असे सांगत २२ तारखेच्या उदघाटन सोहळ्याला जाणार नसल्याचे संकेतच उद्धव ठाकरेंनी दिले.
..तर सर्व कुटुंबासह आंदोलन करू
‘उद्धव ठाकरे यांच्या काळात वेतन मिळत होते. कोरोना काळात ठाकरे यांनी आमची काळजी घेतली, मात्र आत्ताचे सरकार आम्हाला आंदोलन करा म्हणत आहे. येत्या १५ दिवसांत मानधन वाढीचा निर्णय झाला तरच अंगणवाडी सुरू होतील. नाही तर आशा सेविका एक लाख व अंगणवाडी दोन लाख असे तीन लाख त्याचबरोबर आमचे कुटुंबीय सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला.