मुंबई : पावसाळ्यापूर्वी मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मास्टिक, जीओपॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करुन खड्डे बुजवल्यास त्या रस्त्यावरील वाहतूक दोन तासांत सुरु होईल, असा विश्वास पालिकेच्या रस्ते विभागाकडून व्यक्त करण्यात आला. दरम्यान, मान्सूनपूर्व आणि पावसाळ्यात पडणारे खड्डे बुजवण्यासाठी लवकरच वर्क ऑर्डर देण्यात येईल, असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. दरम्यान, पालिकेच्या सात झोनसाठी किमान १० कोटी याप्रमाणे १०६ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
नालेसफाई, झाडांच्या फांद्यांची छाटणी अशी विविध कामे सुरू आहे. तसेच मान्सूनपूर्व व पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मास्टिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यात ३१ मे पूर्वी रस्त्यांची दुरुस्ती आणि पावसाळ्यात पडणारे खड्डे बुजवण्याचे काम अशी कामे करण्यात येणार आहे. यासाठी मास्टिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून लवकरच वर्क ऑर्डर देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत पालिकेच्या अखत्यारित सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडत असल्याने पालिकेला मोठ्या टीकेचा सामना करावा लागतो. त्यामुळे पालिका सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे धोरण राबवण्यात येत आहे. पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर आला असताना पालिकेला शहरातील रस्तेकामासाठी कंत्राटदारच मिळत नसल्याची स्थिती आहे. तर पूर्व-पश्चिम उपनगरातील रस्त्यांची फक्त २० टक्केच कामे झाली आहेत. त्यामुळे शिल्लक दोन महिन्यांत रस्त्यांची कामे पूर्ण कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला असल्यामुळे मुंबईकरांचा पावसाळा यावर्षी खड्ड्यात जाण्याची स्थिती आहे. त्यामुळे पालिका अत्याधुनिक तंत्रज्ञानाने खड्डे बुजवणार आहे. यासाठी आवश्यक टेंडर प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या रस्ते विभागाकडून सांगण्यात आले.
असा आहे मास्टिक तंत्रज्ञानाचा फायदा
मुंबईतील रस्त्यांची पावसाळ्याआधी दुरुस्ती, खड्डे बुजवण्याचे काम करताना केवळ खड्डे न बुजवता जास्तीत जास्त मास्टिक सरफेस तंत्रज्ञानाने रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये केवळ खड्डा न बुजवता संपूर्ण रस्त्याची सरफेस मास्टिक पद्धतीने दुरुस्ती करण्यात येईल. मास्टिक डांबरीकरणात १८० ते २०० अंश डिग्री सेल्सिअस तापमान असते. ते सर्वात जलद गतीने स्थिर होते. त्यामुळे अपयशी ठरलेल्यामुळे कोल्डमिस्कऐवजी मास्टिक अस्फाल्टचा वापर करण्यात येणार आहे.
असे आहे नवे तंत्रज्ञान
पालिकेच्या माध्यमातून पूर्व मुक्त द्रूतगती मार्गावर ‘मायक्रो सरफेसिंग’ तंत्रज्ञानाने रस्त्याचे काम मजबूतरीत्या करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाने रस्त्याचे काम केल्यानंतर अवघ्या दोन तासांत वाहतूक सुरू करता येते. तर जिओ पॉलिमर तंत्रज्ञानात खड्ड्यांच्या जागीच मटेरियल तयार करून तातडीने खड्डा भरला जातो. सिमेंट रस्त्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. २ तासांत हे मटेरियल सुकल्यानंतर वाहतूक सुरू करता येते. ‘हेवी वेट’ वाहनांची वाहतूक असणाऱ्या रस्त्यांसाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे. १ चौरस मीटर खड्डा भरण्यासाठी ५ हजार रुपयांचा खर्च येतो.