शिरीष पवार / मुंबई
मुलांना गणित आणि विज्ञान या विषयांचे शिक्षण घेणे सोपे आणि अधिक आनंददायी व्हावे या हेतूने मुंबई महापालिकेच्या २५ शाळांमध्ये नाविन्यपूर्ण गणित आणि विज्ञान केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. या शैक्षणिक योजनेवर सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
महापालिकेच्या २५ शाळांमध्ये ही केंद्र उभारण्यासाठी नुकत्याच निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
मुलांचा गणित या विषयाबद्दलचा न्यूनगंड दूर व्हावा, त्यांना गणिताच्या संकल्पना सुलभपणे समजून घेता याव्यात, त्याचप्रमाणे विज्ञानाचे शिक्षण हे प्रत्यक्ष कृती आधारित प्रयोगांतून दिले जावे, मुलांचा विज्ञान विषयक दृष्टिकोन वाढीस लागून त्यांना वैज्ञानिक घटनांचे आकलन व्हावे, त्यांना विविध वैज्ञानिक उपकरणांची ओळख व्हावी, त्यांचे निरीक्षण अचूक व्हावे आणि घटनांबाबत वैज्ञानिक निष्कर्ष काढण्याची सवय त्यांच्यात रुजावी, शास्त्रीय तत्वांची सत्यता पडताळून पाहण्याची वृत्ती मुलांमध्ये वाढीस लागावी, त्यांची वैज्ञानिक कौशल्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट व्हावा, या उद्देशाने ही केंद्र उभारली जाणार आहेत.
नाविन्यपूर्ण गणित व विज्ञान केंद्रांच्या उभारणीसाठी महापालिकेने काही दिवसांपूर्वी निविदा मागविल्या होत्या. पालिका प्रशासनाने तयार केलेल्या खर्चाच्या अंदाजानुसार अशा एका केंद्रासाठी १३ लाख ९८ हजार रुपये खर्च अपेक्षित होता. यामध्ये १८ टक्के जीएसटी आणि दहा टक्के पर्यवेक्षणीय आकाराचा समावेश नाही. जीएसटी आणि पर्यवेक्षणीय आकार समाविष्ट करून २५ केंद्रांच्या उभारणीसाठी एकूण तीन कोटी ४९ लाख ५७ हजार रुपये खर्च येईल, असा पालिकेचा अंदाज होता. या कामासाठी एकूण चार निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी दोन निविदा कागदपत्रांची पूर्तता न केल्याने बाद ठरविण्यात आल्या. उर्वरित दोन निविदांपैकी मीत एंटरप्राइजेसची निविदा ही ८.१८ टक्के अधिक दराची, तर रियल स्टार एज्युकेशनची निविदा १.५१ टक्के कमी दराची आहे. त्यामुळे रियल स्टार एज्युकेशनची न्यूनतम बोलीची निविदा मंजूर करण्याची शिफारस प्रशासनाने स्थायी समिती तसेच सुधार समितीला केली आहे. १८ टक्के जीएसटी आणि दहा टक्के पर्यवेक्षणीय आकार मिळून या निविदेनुसार २५ केंद्रांच्या उभारण्यासाठी एकूण चार कोटी ४६ लाख ८७ हजार रुपये इतका खर्च येणार आहे.
कृती आधारित शिक्षणावर भर
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे त्यांचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास होय. पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांमधील वैज्ञानिक संज्ञा सोप्या रीतीने समजून त्या दृढ होण्यासाठी कृती आधारित प्रयोगांतून शिक्षण देण्याची गरज आहे. गणिताविषयीची भीती विद्यार्थ्यांच्या मनातून नाहीशी करण्याची गरज आहे. त्यासाठी ही केंद्र उपयुक्त ठरतील, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.