मुंबई : सोलापूर येथील एका एमडी ड्रग्ज कारखान्याचा वांद्रे यूनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. राहुल आणि अतुल किशन गवळी अशी या दोघांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी १६ कोटी १९ लाख रुपयांचे ८ किलो एमडी ड्रग्जसहित १०० कोटी रुपयांचा एमडीसाठी लागणारा कच्चा माल असा ११६ कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले. या कारवाईत पोलिसांनी सोलापूर येथे सुरू असलेला एमडी ड्रग्जचा कारखाना सील केला आहे. कारखान्यात तयार झालेला एमडी ड्रग्ज विक्रीसाठी ते दोघेही आले आणि ते दोघेही फसले गेले. चालू वर्षांतील एमडी ड्रग्जची ही आतापर्यंत सर्वांत मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते.
गेल्या काही वर्षांत एमडी ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच खार परिसरात काहीजण एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती. या माहितीनंतर विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम, पोलीस उपायुक्त शशीकुमार मीना, सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई यांच्या पथकातील दया नायक, दिपक पवार, उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील, सुभाष शिंदे व अन्य पोलीस पथकाने खार येथील खारदांडा, कार्टर रोड, स्माशनभूमीजवळील खळा मैदानात साध्या वेशात पाळत ठेवली होती. शनिवारी तिथे राहुल गवळी आणि अतुल गवळी आले होते. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी या दोघांकडून पोलिसांनी पाच किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. या ड्रग्जची आंतरराष्ट्रहीय बाजारात किंमत दहा कोटी सतरा लाख रुपये इतकी किंमत होती. एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन या दोघांना एमडी ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना गुरुवार १९ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांच्या चौकशीत ते दोघेही सोलापूरचे रहिवाशी असून त्यांनी तिथे एमडी ड्रग्जचा कारखानाच सुरुच केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली होती. त्यानंतर दया नायक व त्यांच्या पथकाने सोलापूर येथील चिंचोली, एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यात छापा टाकला होता. या छाप्यादरम्यान तिथे एमडी ड्रग्ज बनविण्याचे काम सुरु असल्याचे दिसून आले. या कारवाईत पोलिसांनी तीन किलो एमडी ड्रग्जसह एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे ५० ते ६० किलो कच्चा माला असा सुमारे शंभर कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी ८ किलो ०९५ किलो एमडी ड्रग्ज तर ५० ते ६० किलो कच्चा माल असा एकशे सोळा कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांनी तिथे हा कारखाना सुरु होता. त्यातून तयार होणारा एमडी ड्रग्ज विविध शहरात विक्री केला जात होता. या गुन्ह्यांत या दोघांच्या अटकेनंतर इतर काही आरोपींचे नाव समोर आले असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.