टॉपवर्थ समूहाच्या कंपनीच्या एमडीला अटक

बँकांच्या फसवणुकीप्रकरणी ‘ईडी’ची कारवाई
टॉपवर्थ समूहाच्या कंपनीच्या एमडीला अटक

मुंबई : एका कथित बँक फसवणुकीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मेसर्स टॉपवर्थ स्टील ॲॅण्ड पॉवर प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व प्रवर्तक अभय नरेंद्र लोढा यांना ‘ईडी’ने अटक केली.

ईडीने एका निवेदनात म्हटले आहे की, लोढा हे टॉपवर्थ स्टील्स अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड (टीएसपीपीएल) आणि टॉपवर्थ ग्रुपचे प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. कंपनीच्या वेबसाइटनुसार, तिचे नोंदणीकृत कार्यालय मुंबईत आहे, तर तिचा प्लांट छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात आहे. कंपनी कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्युशन प्रक्रिया (सीआयआरपी) अंतर्गत आहे.

‘ईडी’ने मुंबई, पुणे, नवी दिल्ली, नागपूर, दुर्ग येथे बँक घोटाळ्याप्रकरणी १२ ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत कंपनीच्या अचल मालमत्तेबाबत माहिती मिळाली. ही माहिती कंपनीने जाहीर केली नव्हती. तसेच त्यांच्याकडे ७ लाख रुपयांचे परकीय चलन सापडले. तसेच आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत.

२०१४-१५ ते २०१६-१७ दरम्यान लेटर ऑफ क्रेडिट व ट्रेड क्रेडिट बँक गॅरंटीद्वारे आयडीबीआय बँकेची ६३.१० कोटी रुपयांची फसवणूक टॉपवर्थ समूह कंपन्यांनी केली. या कंपन्यांची मालकी अभय लोढा यांच्याकडे आहे. या गुन्ह्यातून त्यांनी ३ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले.

२०१४ ते २०१६ दरम्यान आयडीबीआय बँकेची ६३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने मुंबईस्थित कंपनी व त्यांच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. कंपनीचे संचालक अभय लोढा, सुरेंद्र लोढा, अश्विन लोढा, नितींग गोलेचा यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला.

या समूहातील नऊ कंपन्यांना त्यांच्या कर्जदारांकडून खटल्यांचा सामना करावा लागला आहे. ज्यामुळे सात समूह कंपन्यांमध्ये दिवाळखोरी निराकरणाची कार्यवाही झाली. सीबीआयच्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने शोध घेतला. त्यातून कागदपत्रे सापडली. या टॉपवर्थ स्टील ॲॅण्ड पॉवर कंपनीने बँकांकडून ४३९२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. ते सध्या दिवाळखोरी प्रक्रियेत सापडले आहे. ही कंपनी स्टील, ॲॅल्युमिनियमची उत्पादने, खनिजांची मशिनरी, पाइप, ट्यूब व ॲॅल्युमिनियम फॉइल बनवते.

बँक ऑफ बडोदा, पीएनबी, एसबीआय व यूको बँकेने या टॉपवर्थ समूहाविरोधात तक्रारी केल्या आहेत. इंडियन बँकेने यापूर्वीच अभय लोढा व अश्विन लोढा यांचे कर्ज खाते बुडित खाते म्हणून जाहीर केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in