"मी पण गांधी" देणार भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला प्रत्युत्तर! 'इंडिया' आघाडीकडून पदयात्रेचं आयोजन

फोडाफोडी करून सत्ता काबीज करणे हा भाजपचा अजेंडा आहेच
"मी पण गांधी" देणार भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला प्रत्युत्तर! 'इंडिया' आघाडीकडून पदयात्रेचं आयोजन

भाजप देशभर 'फोडा आणि राज्य करा' ही इंग्रजांची नीती वापरत आहे. मुंबईसह महाराष्ट्रात घडणाऱ्या विद्वेषाच्या घटना याच कूटनीतीचा परिणाम आहे. या घटनांचा निषेध करतानाच समाजात सद्‍भावनेचा विचार रूजवण्याची गरज आहे. प्रेम, सद्भावना, शांतता हा महात्मा गांधीजींचा विचार समाजमानसात पोहोचण्यासाठी इंडिया आघाडी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी 'मी पण गांधी' हा नारा देत मुंबईत पदयात्रा काढणार आहे, अशी घोषणा मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली.

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या राजीव गांधी भवन कार्यालयात पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी सहभाग घेतला. यावेळी सर्वांकडून भाजपच्या कूटनितीचा विरोध केला गेला.या वेळी इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे मुंबईतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.

मुंबईत मराठी माणसांना घर नाकारण्याचा प्रश्न असो किंवा कांदिवलीतील मराठी तरुणांना झालेली मारहाण असो, की देशभरात वाढलेल्या विद्वेषी हिंसेच्या घटना असो, या सर्वच घटनांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विद्वेषाचं राजकारण जबाबदार आहे. या घटनांचा आणि त्यामागे असलेल्या मनोवृत्तीचा निषेध आम्ही सर्वच करतो, असं मत वर्षा गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केलं.

भाजपच्या दुटप्पीपणाचाही निषेध करत वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जातात, तेव्हा तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्यापुढे नतमस्तक होतात. देशात मात्र त्यांचे अनुयायी महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे गोडवे गातात. मनोहर कुलकर्णी गांधीजींवर गरळ ओकतो. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि १५ ऑगस्टचा खुलेआम अवमान करतो. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार त्याविरोधात का कारवाई करत नाही? असा सवालही वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला.

त्या म्हणाल्या की,

फोडाफोडी करून सत्ता काबीज करणे हा भाजपचा अजेंडा आहेच. पण आता मुंबई महापालिकेसारख्या स्वायत्त संस्थांमध्येही कब्जा करण्याचं धोरण भाजपने अवलंबलं आहे. मुंबईचे पालकमंत्री आ. मंगलप्रभात लोढा यांनी महापालिकेत बेकायदा कब्जा करून कार्यालय थाटलं आहे. विधानसभेत आम्ही त्याविरोधात आवाज उठवला, मात्र आता रस्त्यावर उतरून याचा विरोध करण्यात येईल, असा इशाराही गायकवाड यांनी दिला.

गांधी विचार दडपण्याच्या प्रयत्नांना छेद देण्यासाठी राष्ट्रपीता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त इंडिया आघाडीतर्फे खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई प्रदेश काँग्रेस समितीने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला असून आघाडीतील इतर घटक पक्षांची साथ त्यांना लाभली आहे. या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन इंडिया आघाडीकडून करण्यात आलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in