गोवर उद्रेक नियंत्रण माॅडेल देशभरात राबवा! जोखीमग्रस्त भागात सहा टीम

प्रत्येक वर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेमार्फत जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा २०२४ या वर्षाचे आरोग्य दिनाचे घोषवाक्य 'माझं आरोग्य, माझा अधिकार' हे आहे.
गोवर उद्रेक नियंत्रण माॅडेल देशभरात राबवा! जोखीमग्रस्त भागात सहा टीम

मुंबई : गोवर रुबेलावर मात करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. २०२५ पर्यंत गोवर रुबेला ९५ टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेच्या आरोग्य विभागाचे आहे. मुंबई गोवर रुबेला नियंत्रण माॅडेल यशस्वी झाले असून देशभरात गोवर रुबेला माॅडेल राबवण्याची गरज आहे, असे मत तंज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. दरम्यान, लसीकरण कमी असलेल्या क्षेत्रात लसीकरण मोहिमेला वेग देण्याची गरज असून जोखीमग्रस्त भागात लसीकरणासाठी सहा वैद्यकीय टीम तयार करणे गरजेचे असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रत्येक वर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेमार्फत जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा २०२४ या वर्षाचे आरोग्य दिनाचे घोषवाक्य 'माझं आरोग्य, माझा अधिकार' हे आहे. 'माझं आरोग्य, माझा अधिकार' या घोषवाक्यानुसार प्रौढांच्या आरोग्याप्रमाणे लहान बाळांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी मुलांचे लसीकरण करणे आवश्यक आहे, असे आवाहन पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी केले आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने नियमित लसीकरण बळकटीकरणासाठी तसेच गोवर रुबेला दुरीकरण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. पालिकेतील सार्वजनिक आरोग्य खात्यातील आरोग्य अधिकारी यांच्यासाठी दोन दिवसीय (६ ते ७ एप्रिल) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबईतील गोवर रुबेला लसीकरणाची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी नियोजन करून कार्य करण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले आहेत. या कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी जागतिक तसेच भारतीय स्तरावरील नियमित लसीकरण आणि गोवर रुबेला उद्रेकाविषयी आकडेवारी सादर करून त्यावर चर्चा केली. तसेच २०२२-२३ मध्ये मुंबई गोवर उद्रेक नियंत्रण मॉडेलचे कौतुक देखील डॉक्टरांनी केले. सदर मॉडेल पूर्ण भारतामध्ये राबविण्याविषयीची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

या कार्यशाळेमध्ये आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित लसीकरणाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. २०२४-२०२५ मध्ये गोवर रुबेला लसीकरण ९५ टक्के पूर्ण करण्याच्या दिशेने करावयाच्या कार्यवाहीबाबत जागतिक आरोग्य संघटना तसेच महानगरपालिकेतील अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेमुळे सर्व आरोग्य अधिकारी यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण होऊन एका नवीन दिशेकडे पाऊल टाकण्यात येईल, असा विश्वास सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नियमित लसीकरण मोहीम बळकट करण्यासाठी सामाजिक सहकार्य देखील नितांत आवश्यक आहे, असे मार्गदर्शन करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in