गोवरचे टेन्शन! कस्तुरबा रुग्णालयात बेड्स, व्हेंटिलेटरची संख्या वाढवणार

कस्तुरबा रुग्णालयामध्ये सध्या तीन वॉर्ड असून, ८३ खाटा, १० आयसीयू आणि ५ व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध
गोवरचे टेन्शन! कस्तुरबा रुग्णालयात बेड्स, व्हेंटिलेटरची संख्या वाढवणार

मुंबईत गोवर आजाराचा झपाट्याने फैलाव होत असून, सध्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. मात्र, रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता कस्तुरबा रुग्णालयात आणखी १२ व्हेंटिलेटर आणि ४८ बेड्सचा एक वॉर्ड वाढवण्यात येणार आहे. यामुळे आणखी ४८ बेड्स वाढतील, अशी माहिती कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी दिली.

मुंबईत गोवरचे १४२ रुग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण गोवंडीतील आहेत. लक्षणे दिसणाऱ्या ६८ रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील ५ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी एका रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. कस्तुरबा रुग्णालयामध्ये सध्या तीन वॉर्ड असून, ८३ खाटा, १० आयसीयू आणि ५ व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे. गोवरच्या रुग्णांना उपचार वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी कस्तुरबा रुग्णालयामध्ये गरज भासल्यास ४८ खाटांचा आणखी एक वॉर्ड सुरू करण्यात येणार आहे. सध्या आयसीयूच्या १० खाटा आहेत, त्यात वाढ करून त्या २० पर्यंत वाढवल्या जातील. तसेच सध्या ५ व्हेंटिलेटर आहेत. त्यात आणखी १२ व्हेंटिलेटर वाढवून व्हेंटिलेटरची संख्या वाढवून १७ केली जाईल. त्याचप्रमाणे गंभीर रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती डॉ. पवार यांनी दिली.

खासगी रुग्णालयेही सज्ज गोवर आजारासाठी मोफत ई-ओपीडीची सुविधा

गोवर आजाराचा झपाट्याने प्रसार होत असून, पालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात विशेष वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत, मात्र गोवरचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खासगी रुग्णालयेही सज्ज झाली आहेत. दरम्यान, अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल ज्यांची मुंबईत अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेली पाच रुग्णालये आहेत, या रुग्णालयांमध्ये गोवर आजारासंबंधित माहिती व प्रथमोपचारासाठी ई-ओपीडी सुरू केली आहे. बालकांमध्ये गोवरसदृश लक्षणे आढळल्यास त्यांनी ई-ओपीडी ९१३६६६ ५१०५ व ९१३६६६ ३५०५ या क्रमांकांवर फोन करून डॉक्टरांशी संपर्क साधावा, अशी माहिती अपेक्स ग्रुप ऑफ रुग्णालयाचे मुख्य मार्केटिंग अधिकारी निखिल जाधव यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in