तंटा निवारणासाठी सरन्यायाधीशांचा पुढाकार; मुंबई ग्राहक पंचायत मध्यस्थ उपलब्ध करून देणार

देशात साडेचार कोटींहून अधिक प्रलंबित दाव्यांची गंभीर दखल घेत सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी ‘मेडिएशन फॉर द नेशन’ ही मध्यस्थीद्वारे तंटा निवारणाची विशेष मोहीम जाहीर केली आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने सरन्यायाधीश न्या. गवई यांच्या मध्यस्थीद्वारे तंटा निवारणासाठी घेतलेल्या पुढाकाराचे मुंबई ग्राहक पंचायतीने स्वागत केले आहे.
तंटा निवारणासाठी सरन्यायाधीशांचा पुढाकार; मुंबई ग्राहक पंचायत मध्यस्थ उपलब्ध करून देणार
Published on

मुंबई : देशात साडेचार कोटींहून अधिक प्रलंबित दाव्यांची गंभीर दखल घेत सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी ‘मेडिएशन फॉर द नेशन’ ही मध्यस्थीद्वारे तंटा निवारणाची विशेष मोहीम जाहीर केली आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने सरन्यायाधीश न्या. गवई यांच्या मध्यस्थीद्वारे तंटा निवारणासाठी घेतलेल्या पुढाकाराचे मुंबई ग्राहक पंचायतीने स्वागत केले आहे.

ग्राहक न्यायालयातील प्रलंबित दाव्यांमध्ये मध्यस्थीद्वारे तक्रार निवारणासाठी मुंबई ग्राहक पंचायतीचे दहा प्रशिक्षित मध्यस्थ तसेच जागा आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.

मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी याबाबत राज्य ग्राहक आयोगाच्या अध्यक्षांना याबाबत पत्र लिहिले आहे.

१ जुलै ते ३१ जुलै या दरम्यान कौटुंबिक न्यायालयांतील तंटे, मोटर अपघात तंटे, ग्राहक न्यायालयातील तंटे, धनादेश नाकारण्याचे आणि कर्ज वसुलीचे तंटे असे अनेक प्रलंबित तंटे, ज्यात मध्यस्थीने तंटा निवारण होण्याची शक्यता आहे त्याची संबंधित न्यायालयांतर्फे निवड केली जाईल, त्या तोट्यातील पक्षकारांना त्यानुसार कळवण्यात येईल आणि या तंट्यांत मध्यस्थीने तंटा निवारणासाठी मध्यस्थाची नेमणूकही केली जाईल. सप्टेंबर अखेरपर्यंत या तंट्यांत मध्यस्थीने निवारण करण्याचे या विशेष योजने अंतर्गत अपेक्षित आहे.

न्यायव्यवस्थेवरील भार कमी होणार

केंद्र सरकारने २०२३ मध्ये संसदेने संमत केलेला ‘मध्यस्थी कायदा’ त्वरित अंमलात आणावा, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने केली आहे. जेणेकरून मध्यस्थीद्वारे तंटा निवारणाला कायदेशीर आयाम प्राप्त होऊन पर्यायी तंटा निवारण व्यवस्थेला लोकमान्यता प्राप्त होईल आणि प्रचलित न्यायव्यवस्थेवरील भार काही प्रमाणात तरी कमी होण्यास हातभार लागू शकेल.

logo
marathi.freepressjournal.in