वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; केंद्रीय स्तरावरील वेळापत्रकातील बदलामुळे निर्णय

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीसाठीच्या नोंदणी प्रक्रियेला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार राज्य कोट्यांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीस राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीसाठीच्या नोंदणी प्रक्रियेला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार राज्य कोट्यांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीस राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नीट यूजी परीक्षेच्या निकालानंतर तब्बल एक महिन्याने वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) अखिल भारतीय कोट्याचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने राज्य कोट्यांतर्गत एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी २३ ते ३० जुलैदरम्यान नोंदणी प्रक्रिया सुरू केली.

एमसीसीने ३० जुलै रोजी केंद्रीय कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिल्याने सीईटी कक्षाने राज्यातील प्रवेशासाठी नोंदणी करण्यासाठी ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीमध्ये नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत कागदपत्रे जमा करून शुल्क भरता येईल. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी व उपलब्ध जागांचा तपशील ६ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच ६ ते ९ ऑगस्टदरम्यान या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीची निवड यादी ११ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.

राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या ४८ हजार जागा

राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या एकूण ४८ हजार ०३९ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये आयुर्वेद पदवी (बीएएमएस) अभ्यासक्रमासाठी ९ हजार ७३१ जागा, होमिओपॅथी (बीएचएमएस) अभ्यासक्रमासाठी ४ हजार ४१७, एमबीबीएससाठी ८ हजार १४१ जागा आहेत. यात ३६ शासकीय महाविद्यालयांत ४ हजार १५७ जागा असून, ५ अनुदानित संस्थांमध्ये ७६४ आणि २३ खासगी संस्थांमध्ये ३ हजार २२० जागा आहेत. दंतशास्त्र (बीडीएस) अभ्यासक्रमासाठी एकूण २ हजार ६७५ जागा उपलब्ध आहेत.

logo
marathi.freepressjournal.in