मुंबई : ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रियेसाठी उच्च क्षमतेच्या मशिनरीचा वापर केला जातो. शस्त्रक्रियेवेळी मशीनरीत बिघाड झाल्यास रुग्णाला विजेचा झटका बसून दुर्घटना घडू नये यासाठी रिमोट अलार्मसह मेडिकल आयसोलेशन पॅनल बसवण्यात येणार आहे. केईएम रुग्णालयात अद्यावत तंत्रज्ञान असलेल्या या उपकरणाचा वापर यशस्वी झाल्यानंतर अन्य रुग्णालयात बसवण्यात येणार आहे. यासाठी पालिका साडेसहा कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या शरीराची प्रतिकार क्षमता कमी झाल्याने १ मिली ॲम्पियर एवढा कमी विद्युत प्रवाहसुद्धा रुग्णाच्या जीवितास घातक ठरू शकतो. जागतिक विद्युत नामांकनानुसार शस्त्रक्रिया विभाग हा गट २ म्हणजेच अतिसंवेदनशील क्षेत्रात मोडतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यासाठी लिकेज विद्युत प्रवाह रुग्णाच्या शरीरात प्रवाहित न होणे तसेच लिकेज विद्युत प्रवाह बिघाड झाल्यास शस्त्रक्रिया विभागातील विद्युत प्रवाह खंडित न होणे, यासाठी रिमोट अलार्मसह मेडिकल आयसोलेशन पॅनल बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्युत उपकरणे रुग्णांच्या थेट संपर्कात
पालिकेच्या केईएम रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी दाखल होत असतात. त्यातील किरकोळ आजारांवरील रुग्णांना बाह्य रुग्ण सेवेद्वारे उपचार केले जातात, तर काही गंभीर स्वरुपाच्या आजारांवरील रुग्णांना दाखल करून घेतले जाते. अशा गंभीर स्वरूपाच्या आजारांवरील जटील तसेच इतरही विविध शस्त्रक्रिया केल्या जातात. ज्यामध्ये काही विद्युत उपकरणे रुग्णांच्या थेट संपर्कात येतात. शस्त्रक्रिया विभागात विविध उच्च क्षमतेच्या मशिनरी वापरल्या जातात. शस्त्रक्रिया विभागात वापरण्यात येणाऱ्या उपकरणात काही बिघाड झाल्यास लिकेज विद्युत प्रवाह तयार होतो. अशी उपकरणे थेट रुग्णाच्या संपर्कात आल्या, तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.