गोरगरीबांसाठी वैद्यकीय सेवेचा 'श्रीगणेशा'! किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाचा स्तुत्य उपक्रम

श्रीमंत गणपती अशी ख्याती असलेल्या किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाने यंदा गोरगरीब रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प केला आहे. सामाजिक वसा घेतलेल्या जीएसबी सेवा मंडळाकडून ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथे १०० खाटांचे अत्याधुनिक सुविधांचे रुग्णालय उभारले जाणार आहे
गोरगरीबांसाठी वैद्यकीय सेवेचा 'श्रीगणेशा'! किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाचा स्तुत्य उपक्रम
VIJAY GOHIL
Published on

मुंबई : श्रीमंत गणपती अशी ख्याती असलेल्या किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाने यंदा गोरगरीब रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प केला आहे. सामाजिक वसा घेतलेल्या जीएसबी सेवा मंडळाकडून ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथे १०० खाटांचे अत्याधुनिक सुविधांचे रुग्णालय उभारले जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष बांधकामाचा श्रीगणेशा होणार असून एक ते दीड वर्षात ते पूर्ण करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. गोरगरीब रुग्णांना अत्यल्प दरात उपचारांची सुविधा या रुग्णालयात उपलब्ध होणार आहे.

जीएसबी सेवा मंडळातर्फे किंग्ज सर्कल येथे ७० वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. मंडळ शास्त्रोक्त पद्धतीनुसार गणेशोत्सव साजरा करते. सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत फक्त गणेशाची पूजा केली जाते. भक्तांच्या विविध प्रकारच्या पूजा, हवन असतात. ‘नवसाला पावणारा विश्वाचा राजा’ अशी जीएसबी सेवा मंडळाच्या गणपतीची ओळख आहे. गणेशोत्सवाबरोबर गरजू रुग्णांना आर्थिक मदत, विविध शैक्षणिक उपक्रम मंडळाकडून राबवले जातात.

जीएसबी गणपती पूजेचा प्रसाद आणि दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भक्त येतात. जीएसबी गणपतीला लोक श्रीमंत गणपती म्हणत असले तरी आमचा गणपती आशीर्वाद देण्यामध्ये श्रीमंत आहे. त्यांच्या आशीर्वादाने मंडळाचे कार्य पुढे चालले असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अमित पै यांनी सांगितले.

पूजा, आराधना केल्यानंतर पाचव्या दिवशी जीएसबी गणपतीचे विसर्जन करण्यात येते. लाखो भाविकांना विना अडथळा, विना धक्काबुक्की, गर्दी याशिवाय दर्शन घेता यावे, यासाठी सुमारे साडे तीन हजार स्वयंसेवक चार महिन्यांपासून तयारी करतात. भक्त आणि कुटुंबाला बाप्पाचा आशीर्वाद मिळावा यासाठी हे स्वयंसेवक विविध जबाबदारी पार पडतात. धार्मिक, अध्यात्मिक पद्धतीने मंडळ गणेशोत्सव साजरा करते.

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळाच्या सुमारे ५४ शाखा आहेत. या विविध शाखांमध्ये साडे तीन हजार कार्यकर्ते काम करतात. त्यामुळे लाखो भाविकांना पाच दिवस विनाअडथळा सुरळीत दर्शनाचा लाभ घेता येतो, असे पै यांनी सांगितले. उत्सव काळात दररोज १० ते १५ हजार लोक महाप्रसादाचा लाभ घेतात. महाप्रसादाचे वाटप शास्त्रोक्त पद्धतीने जमिनीवर बसून केळीच्या पानावर भक्तांना करण्यात येते. कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे मोठा उत्सव पार पडतो, असे अमित पै यांनी सांगितले.

गोरगरीबांसाठी वैद्यकीय सेवेचा 'श्रीगणेशा'! किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाचा स्तुत्य उपक्रम
नवशक्ति-FPJ इको गणेश: पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा आणि जिंका मोठी बक्षिसे

श्रींची १६ फूट उंच इको फ्रेंडली मूर्ती, ६६ किलो सुवर्ण अलंकारउत्सवासाठी

जीएसबी मंडळाच्या गणेश मूर्तीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शाडूच्या मातीची मूर्ती असते. मूर्तीची उंची १६ फूट असते. नैसर्गिक रंगाने ही मूर्ती बनविण्यात येते. इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करण्यात येतो.गणपतीच्या मूर्तीला सोने, चांदी चढविलेली आहे. भाविकांनी केलेल्या दानातून ६६ किलो सोने आणि ३७५ किलो चांदीचे दागिने मूर्तीला घालण्यात येतात. त्यामुळे या गणपतीला मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखले जाते.

४०० कोटींची विमा सुरक्षा

मूर्तीला सोन्या-चांदीचे दागिने चढविण्यात येत असल्याने मंडपात कोणतीही मोठी सजावट अथवा देखावा केला जात नाही. फुलांचे आणि पानांचे डेकोरेशन करण्यात येते. दरवर्षी मंडळ भक्त, गणेश मूर्तीचे दागिने, कार्यकर्ते आणि आजूबाजूच्या इमारतींमधील नागरिक यांच्या सुरक्षेचा विमा काढते. यंदा मंडळाने विक्रमी रकमेचा विमा काढला आहे. यंदाच्या उत्सवासाठी मंडळाने तब्बल ४०० कोटींचा विमा काढला आहे.

logo
marathi.freepressjournal.in