विमान प्रवासादरम्यान आकाशात अवतरला 'देवदूत'; मेडिकल विद्यार्थी आर्यन लोलयेकरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

वैद्यकीय शिक्षण हे केवळ पदवीसाठी नसून आणीबाणीच्या प्रसंगी एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी असते, याचा प्रत्यय नुकताच गोवा-मुंबई विमान प्रवासादरम्यान आला. पालघर जिल्ह्यातील वेदांत मेडिकल कॉलेजचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आणि वसईचा रहिवासी डॉ. आर्यन लोलयेकर याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका सहप्रवाशाला अक्षरशः जीवदान मिळाले.

Published on

अनिलराज रोकडे / वसई

ही घटना ३ फेब्रुवारी रोजी घडली. गोवा येथील दाबोलीम विमानतळावरून दुपारी ३.५० वाजता इंडिगो एअरलाइन्सचे विमान मुंबईकडे झेपावले. विमान हवेत स्थिरावल्यानंतर काही वेळातच एका सहप्रवाशाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. क्षणोक्षणी त्या प्रवाशाची प्रकृती खालावत गेली आणि विमानातील वातावरण तणावपूर्ण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विमानातील क्रू मेंबर्सनी “विमानात कोणी डॉक्टर आहेत का?" अशी घोषणा केली. त्यावेळी एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले डॉ. आर्यन लोलयेकर तत्काळ मदतीसाठी पुढे सरसावले.

रुग्णाची तपासणी करताना डॉ. आर्यन यांनी रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने घटत असल्याचा अंदाज घेतला. रुग्णाचा नाडीचा वेग कमी होत होता आणि तो अर्धबेशुद्ध अवस्थेत जात होता. हजारो फूट उंचीवर उड्डाण करणाऱ्या विमानात ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरू शकत होती. अशा वेळी डॉ. आर्यन यांनी शांतपणे परिस्थिती हाताळत तातडीने प्रथमोपचार सुरू केले. विमानात उपलब्ध असलेल्या आपत्कालीन ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करून रुग्णाला ऑक्सिजन देण्यात आला. त्यांच्या या तत्पर प्रयत्नांमुळे काही वेळातच रुग्णाची प्रकृती स्थिर होऊ लागली. सुमारे ४५ मिनिटांनंतर विमान मुंबई विमानतळावर सुरक्षित उतरले. तेथे इंडिगोच्या ग्राऊंड स्टाफने संबंधित प्रवाशाला पुढील उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले.

प्रवाशाची अवस्था पाहून क्षणभर भीती वाटली, पण वैद्यकीय शिक्षणाने धैर्य दिले. रुग्णाला वेळेवर ऑक्सिजन मिळाला नसता तर परिस्थिती गंभीर झाली असती. एका जीवाचे प्राण वाचवू शकलो, याचे मोठे समाधान आहे.

डॉ. आर्यन लोलयेकर

इंडिगोकडून विशेष कौतुक

या प्रसंगी डॉ. आर्यन यांनी दाखवलेले धैर्य, शांतता आणि प्रसंगावधान याबद्दल इंडिगो एअरलाइन्स तसेच विमानातील प्रवाशांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे आभार मानले. एका भावी डॉक्टरने आपले कर्तव्य बजावत एका अनमोल जीवाचे रक्षण केल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in