
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार झाल्यानंतर लगेचच ठाकरे गटाला धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या मीना कांबळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मीना कांबळी या रश्मी ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.
ठाकरे गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार झाल्यानंतर आता पक्षातील नाराजी बाहेर येऊ लागली आहे. मीना कांबळी यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात पकडला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे. ठाकरे गटातील अनेक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, उपनेत्यांना गळाला लावण्यात यश आले आहे. ठाकरे गटाच्या कार्यकारिणीच्या विस्तारानंतर उपनेत्या मीना कांबळी या नाराज होत्या. ४० वर्षे पक्षात राहिल्यानंतरही मानाचे पद मिळत नसल्यामुळे मीना कांबळी यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
उपनेतेपदाबरोबरच मीना कांबळी यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिर्डी संस्थानचे विश्वस्तपदही देण्यात आले होते. मातोश्री बचत गटाच्याही त्या उपाध्यक्ष होत्या. दक्षिण मुंबईत महिला कार्यकर्त्यांत त्यांचा दांडगा संपर्क होता. २०१७ साली त्यांना महापालिका निवडणुकीचीही उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतरही त्या पक्षात सक्रिय होत्या. त्यामुळे मीनाताई कांबळी यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने ठाकरे गटाला धक्का बसला आहे.