मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानात लोकांची २४ तास वर्दळ तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच असतानाही, बुधवारी सकाळी मैदानाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचा प्रकार घडला. माँ साहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर खळबळ उडाली व शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेऊन संताप व्यक्त केला.
शिवसैनिकांसह बड्या नेत्यांनी शिवाजी पार्कवर धाव घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. ‘ज्यांना आई वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते, अशा व्यक्तीने हे कृत्य केले असावे,” असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुतळ्याची पाहणी करत आरोपीला २४ तासांत अटक करण्याची सूचना पोलिसांना केली.
दरम्यान, अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी शिवाजी पार्क पोलिसांनी ८ टीम तयार केल्या असून आरोपीचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. छत्रपती शिवाजी पार्क मैदानाच्या प्रवेशद्वार असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकावर बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ऑइलपेंटसदृश्य लाल रंग टाकल्याची घटना घडली. या घटनेचे वृत्त पसरताच शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. “हे कोणा भेकड्याचे काम असून पोलीस तपास करत आहेत. शिवसैनिक संयम ठेवून आहेत. पोलिसांनी आरोपीचा लवकरात लवकर शोध घ्यावा,” असे अनिल देसाई यांनी यावेळी सांगितले.
शिवाजी पार्कवर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमल्यानंतर त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा निषेध केला. या घटनेची माहिती शिवाजी पार्क पोलिसांना मिळताच, आरोपीचा शोध घेण्यासाठी ८ पथके तैनात केली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेण्यात येत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुतळ्याच्या ठिकाणी पाहणी केली.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीदेखील या घटनेचा निषेध व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, माजी महापौर विशाखा राऊत, आमदार महेश सावंत आदी शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शिवाजी पार्क परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी या परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे.
कठोर कारवाई करा - एकनाथ शिंदे
ही घटना खूप दुर्दैवी आहे. या घटनेची जेवढी निंदा करावी, जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे. मी पोलिसांना सूचना दिल्या आहेत, ज्याने कोणी हा प्रकार केला असेल त्याला तातडीने अटक करावी. त्याच्यावर कठोर कारवाई करावी, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
राजकीय रंग देऊ नये - फडणवीस
“अशाप्रकारची घटना निषेधार्ह आहे. ज्या कोणी समाजकंटकाने ही घटना केली असेल, त्याला पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील. मात्र, या घटनेला राजकीय रंग देणे मला योग्य वाटत नाही,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पोलिसांकडून आरोपीला अटक
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी आरोपीला अटक केली असून उपेंद्र गुणाजी पावसकर असे त्याचे नाव आहे. आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आरोपीने केला आहे. आरोपीचा जबाब नोंदवल्यानंतर पोलीस अधिक तपास करीत आहेत.