Mumbai : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याने शिवाजी पार्क परिसरात तणाव; ठाकरे गट संतप्त, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

बुधवारी पहाटे सहा ते सात वाजण्याच्या सुमारास शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर कोणीतरी लाल ऑइल पेंट फेकून विटंबनेचा प्रयत्न केला.
Mumbai : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याने शिवाजी पार्क परिसरात तणाव; ठाकरे गट संतप्त, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला
Mumbai : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याने शिवाजी पार्क परिसरात तणाव; ठाकरे गट संतप्त, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला
Published on

मुंबईतील दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ असलेल्या मीनाताई ठाकरे (शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी) यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचा अंदाज असून परिसरात मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

घटनेचा तपशील

बुधवारी पहाटे सहा ते सात वाजण्याच्या सुमारास शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर कोणीतरी लाल ऑइल पेंट फेकून विटंबनेचा प्रयत्न केला. परिसर सकाळच्या वेळेस नेहमी गजबजलेला असतो. येथे मॉर्निंग वॉकसाठी अनेक नागरिक येतात, तसेच जवळच बालमोहन विद्यामंदिर शाळा असल्याने लोकांची वर्दळ असते. या भागात पोलिसांचा नियमित बंदोबस्त असतानाही ही घटना घडल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.

ठाकरे गटाचा संताप आणि आक्रमक प्रतिक्रिया

घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवसैनिकांनी तातडीने पुतळा साफ केला. “पुतळ्यावर आणि चौथऱ्यावर रंग फेकलेला दिसत होता. आम्ही तो पुसून टाकला,” अशी माहिती त्यांनी दिली. प्रारंभी पोलिसांचा अंदाज आहे की हा प्रकार कोणीतरी गर्दुल्याने केला असावा, परंतु ठाकरे गटाने आरोपीचा शोध घेण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना (ठाकरे) गटाचे स्थानिक नेते, आमदार महेश सावंत आणि खासदार अनिल देसाई तातडीने घटनास्थळी पोहोचले. देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ही घटना केवळ निषेध करण्यापुरती नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट दिसते,” असे ते म्हणाले. या समाजकंटकी किंवा भेकडांवर कुठलेच संस्कार झालेले नसतील. पण राज्यातील पोलिस यंत्रणा आणि सरकार काय करतंय? शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी असा प्रकार घडतोय, यावरून सध्या मुंबई सुरक्षित नाहीये, असे दिसतंय. सरकार भलत्यासलत्या कार्यक्रमांमध्ये मश्गुल आहे. अशी टीकाही अनिल देसाई यांनी सरकारवर केली. आरोपींचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली असून सीसीटीव्ही तपासले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. शिवसेना नेत्या विशाखा राऊत यांनी सांगितले की, “सकाळी सहा वाजेपर्यंत परिसर शांत होता. त्यानंतर कोणीतरी पुतळ्यावर रंग फेकला. आमच्या कार्यकर्त्यांनी तातडीने रंग पुसून स्वच्छता केली. परंतु पोलिस काय करत होते हा प्रश्न पडला आहे.”

शिंदे गटाचीही प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांनीही कठोर भूमिका घेत, “अशा निंदनीय कृत्य करणाऱ्यांना शोधून काढून कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा दिला.

तणावग्रस्त वातावरण

घटनेनंतर शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक आणि नागरिक जमल्याने तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी शोधण्याचे प्रयत्न सुरू असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे (‘माँसाहेब’) यांचे १९९५ मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांच्या स्मृतीत हा पुतळा उभारण्यात आला. शिवाजी पार्कच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेला हा पुतळा आणि याच भागात असलेले बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक यामुळे या परिसराला ऐतिहासिक व भावनिक महत्त्व लाभले आहे.

logo
marathi.freepressjournal.in