मीरा बोरवणकर यांची पुस्तके बाजारातून गायब

मागणी अधिक वाढल्याचे निरीक्षण किताबखानाकडून नोंदवण्यात आले
मीरा बोरवणकर यांची पुस्तके बाजारातून गायब

मुंबई : अजित पवारांच्या कथित येरवडा जमीन घोटाळ्यासारखे एकूण ३८ राजकीय गौप्यस्फोट करणारे मीरा बोरवणकर यांचे ‘मॅडम कमिशनर’ नावाचे पुस्तक सध्या बाजारात मिळेनासे झाले आहे. वाचकांना हे पुस्तक शोधून सापडत नसल्याने दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी काहींनी त्यांचे २०१७ मध्ये प्रकाशीत झालेले ‘माझ्या आयुष्याची पाने’ हे पुस्तक शोधण्यास सुरुवात केली असून, ते पुस्तकसुद्धा बाजारात उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.

‘मॅडम कमिशनर’ हे पुस्तक सध्या बाजारात उपलब्ध नसल्यामुळे वाचकांनी ऑनलाइन साईट्सचासुद्धा आधार घेतला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. अशातच आता या पुस्तकाबरोबरच त्यांच्या २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘माझ्या आयुष्याची पाने’ या पुस्तकाची मागणी वाचक करू लागले आहेत. ‘मॅडम कमिशनर’वरून रविवारी चर्चा सुरू झाल्यानंतर ‘किताबखाना’ या लोकप्रिय दुकानात विचारणा सुरू झाल्याचे सांगण्यात आले. हे पुस्तक गेल्या आठवड्यापासून उपलब्ध झाले होते. मात्र, रविवारनंतर याची मागणी अधिक वाढल्याचे निरीक्षण किताबखानाकडून नोंदवण्यात आले.

मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकातून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अनुभव कथन केले असून, यामुळे मात्र महाराष्ट्रातील राजकारण तापताना दिसत आहे. त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकामध्ये त्यांनी येरवड्यामधील पोलिस ठाण्याच्या जमिनीबाबतच्या प्रकरणावर केलेले लिखाण तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्यावर थेट आरोप करणारे असल्याने वाचक त्यावेळी नेमके काय घडले होते, याबाबत जाणून घेण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे ते ‘मॅडम कमिशनर’ नावाचे पुस्तक खरेदी करायला बुक स्टॉलमध्ये जातात. मात्र, त्यांना हे पुस्तकच उपलब्ध होत नसल्याचे सध्या तरी चित्र आहे. तेव्हा या पुस्तकाची दुसरी आवृत्ती येण्याची दाट शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in