
मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रविवारी सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील.
ठाणे येथून रविवारी सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत.
हार्बरवर परिणाम
पनवेल येथून रविवारी सकाळी १०.३३ ते संध्याकाळी ४.४९ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ५.१२ पर्यंत पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत ठाणे येथे जाणारी अप ट्रान्स-हार्बर लाईन सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेलकडे जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर लाईन सेवा रद्द राहतील. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी विभागात विशेष लोकल चालतील.