रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक ; मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाची माहिती

यामुळे तिन्ही मार्गांवरील लोकल उशीराने धावणार असून, काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत
रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक ; मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाची माहिती

मुंबई : रुळांची दुरुस्ती ओव्हरहेड वायर दुरुस्ती सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार १० सप्टेंबर रोजी मध्य हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे तिन्ही मार्गांवरील लोकल उशीराने धावणार असून, काही लोकल रद्द करण्यात येतील, अशी माहिती मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी विद्याविहार स्थानकादरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते सायंकाळी ३.५५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या लोकल विद्याविहार स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या कालावधीत भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन व कुर्ला स्थानकांवर थांबतील. पुढे विद्याविहार स्थानकातून पुढे धीम्या मार्गावर धावतील. तर घाटकोपर स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ व भायखळा स्थानकांत थांबतील.

हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत (नेरुळ आणि किले दरम्यान बीएसयू लाईन आणि तुर्भे आणि नेरुळ दरम्यान ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गासह) दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी - पनवेल व पनवेल सीएसएमटी स्थानकादरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल येथून सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून पनवेलकडे जाणारी ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे, तर नेरुळहून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स हार्बर आणि ठाणे येथून नेरूळसाठी सुटणारी डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवार १० सप्टेंबर रोजी चर्चगेट - मुंबई सेंट्रल दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते सायंकाळी ३.३५ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत चर्चगेट - मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील.

विशेष लोकल सेवा

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-विद्याविहार भागात विशेष उपनगरीय गाड्या धावतील. तर ठाणे- वाशी स्थानकांदरम्यान आणि ब्लॉक काळात ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

logo
marathi.freepressjournal.in