
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तर कुर्ला ते वाशी
दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी १०.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी (ता.१०) मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात आल्याने रविवारी दिवस कालीन ब्लॉक घेण्यात आलेला नाही.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. तर ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जाणार आहेत. ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या सेवा मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील.