तांत्रिकी कामांसाठी आज पश्चिम, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
विविध तांत्रिक कामांसाठी रविवार, २४ जुलै रोजी हार्बर मार्गावर पनवेल- वाशीदरम्यान आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ- गोरेगावदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर ‘मेगाब्लॉक’ घेण्यात येणार आहे.
पनवेल- वाशीदरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत ‘मेगाब्लॉक’ घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३३ पासून दुपारी ३.४९ वाजेपर्यंत पनवेलहून सीएसएमटीला जाणाऱ्या आणि सीएसएमटीहून पनवेल, बेलापूरला सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत जाणाऱ्या लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ठाणे- पनवेल या ट्रान्स हार्बरवरील दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्याही रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. तर बेलापूर- खारकोपर आणि नेरुळ- खारकोपर लोकल सेवा सुरू राहील. सीएसएमटी- वाशी विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार असून, ठाणे- वाशी, नेरुळ ट्रान्स हार्बर सेवाही सुरळीत असणार आहेत. पश्चिम रेल्वेवरही सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ‘मेगाब्लॉक’ असेल. त्यामुळे सांताक्रूझ- गोरेगावदरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.