
मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर आणि अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेसह पश्चिम तसेच हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत ५ व्या आणि ६ व्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत अप मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे येथे अप फास्ट मार्गावर वळवल्या जातील. डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या ठाणे येथे पाचव्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील.
ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत अप आणि डाउन ट्रान्स हार्बर लाईनवर ब्लॉक घेण्यात आला आहे.
पश्चिम मार्गावर सांताक्रुझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे.
सांताक्रुझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक
सांताक्रुझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गांवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत, सर्व जलद मार्गावरील उपनगरीय गाड्या गोरेगाव आणि बोरिवली स्थानकांदरम्यान स्लो मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील आणि अंधेरी आणि बोरिवलीच्या काही गाड्या हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवल्या जातील.