मेगाब्लॉकने मेगाहाल; लोकलच्या रखडपट्टीने प्रवासी वैतागले

रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी नेहमीप्रमाणे मेगाब्लॉक घेतला होता.
मेगाब्लॉकने मेगाहाल; लोकलच्या रखडपट्टीने प्रवासी वैतागले

मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी नेहमीप्रमाणे मेगाब्लॉक घेतला होता. या मेगाब्लॉकचा फटका प्रवाशांना बसला. रविवारचे वेळापत्रक आणि ब्लॉक यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल तब्बल पाऊण तास विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे मेगाहाल झाले. मध्य रेल्वेने विविध कामांसाठी मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेतला होता. तर हार्बर मार्गावर सीएसएमटी - चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर आणि चुनाभट्टी / वांद्रे - सीएसएमटी अप हार्बर मार्गावर ब्लॉक घेतला. तर पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गावर माहीम आणि गोरेगाव स्थानकादरम्यान ब्लॉक घेतला होता. यामुळे रविवारी प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

ब्लॉकमुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकल धिम्या मार्गावर वळविण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांना घाटकोपर ते माटुंगा स्थानकांदरम्यान प्रवास करण्यासाठी तब्बल अर्धा तास लागला. तर कल्याण, ठाणे दिशेने येणाऱ्या लोकल तब्बल पाऊण तास विलंबाने धावत होत्या. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागला.

घाटकोपर ते सीएसएमटी जलदगती लोकलना नेहमी अर्धा तास लागतो, मात्र रविवारी हेच अंतर कापायला एक ते दीड तास लागला. त्यात असह्य उकाडा व कडक उन यामुळे प्रवासी चांगलेच कातावले होते.

logo
marathi.freepressjournal.in