मुंबई : दर आठवड्याच्या रविवारी परिचयाचा असलेला मेगाब्लॉक रेल्वेने यावेळी शनिवारी रात्रीच घेतला. कल्याणला होणाऱ्या अभियांत्रिकी कामामुळे कसाराकडे निघालेली शेवटची लोकल सीएसएमटीवरून शनिवारी रात्रौ १०.४७ दरम्यान निघाली. त्यानंतर लोकल नसल्याने रक्षाबंधनला गेलेल्या बहीण-भावांचे या रात्रीच्या ‘मेगाब्लॉक’ने मोठ्या प्रमाणावर हाल झाले. विशेषत: ठाण्याच्या पुढे राहणाऱ्या प्रवाशांना विविध रेल्वे स्थानकावरच रात्रभर पथारी पसरावी लागली.
कल्याण येथे शनिवारी रात्री मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घेतला. अनेकांना याची कल्पना नसल्याने अनेक प्रवाशांची शेवटची गाडी चुकली. त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या मुलाबाळांना घेऊन बाहेर पडलेल्या भगिनी व लाडक्या भावांना त्याचा प्रचंड त्रास झाला. अनेकांनी शेवटची गाडी पकडण्याचा आटापिटा केला पण तो असफल ठरला. कारण आधीच या गाड्यांमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी होती. डब्यात प्रचंड गर्दी असल्याने श्वास घेतानाही प्रवाशांना त्रास होत होता. त्यामुळे रेल्वेच्या नावाने बोट मोडत हजारो प्रवाशांना फलाटावरच रात्र काढावी लागली.
१०.४७ वाजता शेवटची कसारा लोकल सीएसएमटीवरून सुटली. मेगाब्लॉकची उद्घोषणा कोणत्याही फलाटावर होत नव्हती. त्यामुळे प्रवाशांच्या गोंधळात भर पडली. तसेच कसारा लोकलमधील गर्दी पाहून अनेकांनी गाडी सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर कुठलीही लोकल नसल्याने त्यांना फलाटावरच रात्र काढावी लागले.
लोकलमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. लहान मुले, महिलांना चेंगराचेंगरीचा सामना करावा लागला. त्यातच पावसाची रिपरिप सुरू असल्याने अनेक ठिकाणी छत नसलेल्या स्थानकांवर प्रवाशांचे हाल झाले. हवा लागत नसल्याने लहान मुले रडत होती.
रिक्षा, टॅक्सीवाल्यांकडून लूट
ठाण्याच्या पुढे लोकल नसल्याने अनेक जणांनी रस्तामार्गे जाण्याचा निर्णय घेतला. मिळेल ते वाहन पकडण्याचा प्रयत्न केला जात होता. ‘ॲॅप’ आधारित टॅक्सी सेवेचे दर यादरम्यान अव्वाच्या सव्वा वाढले होते. तसेच एकाचवेळी अनेक जण ते बुकिंग करण्याचा प्रयत्न करत असल्याने ते होत नव्हते. अखेर अनेकांना ठाणे रेल्वे स्थानकावर अपरिहार्यपणे ठिय्या मांडावा लागला. तसेच रिक्षावालेही ठाण्यापुढे जाण्यास तयार नव्हते किंवा वाटेल ते भाडे सांगत असल्याने प्रवाशांनी मिळेल तिथे पथारी पसरून रात्र जागून काढली. मेगाब्लॉक संपताच सकाळी लोकल पूर्ववत झाल्यानंतर प्रवाशांना घर गाठावे लागले.