चाकरमान्यांचे मेगाहाल! मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूककोंडी; कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या उशिराने

आनेवाडी टोलनाक्यावर प्रचंड वाहतूककोंडी झाल्याने महामार्गावर कित्येक किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत
चाकरमान्यांचे मेगाहाल! मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूककोंडी; कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या उशिराने

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांचा मुहूर्त साधत चाकरमान्यांची गावी कोकणात जाण्यासाठी झुंबड उडाली होती, मात्र ठिकठिकाणी वाहतूककोंडी आणि कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या पाच ते सहा तास उशिराने धावत असल्यामुळे एक-दोन दिवसआधीच गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे मेगाहाल झाले.

शनिवार-रविवारी बहुतेक गणेशभक्तांनी आपापल्या वाहनाने कोकण गाठण्याला पसंती दिल्याने मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग चाकरमान्यांसाठी सज्ज असल्याचा राज्य सरकारचा दावा पहिल्याच दिवशी फोल ठरला. गणेशोत्सव स्पेशल ट्रेनमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असून कोकणात जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या ५ ते ६ तास उशिराने धावत आहेत. त्याचा चाकरमान्यांना मोठा फटका बसला आहे. कोकणकन्या, तुतारी, मंगलोर एक्स्प्रेस, कुडाळ गणपती स्पेशल, दिवा-रत्नागिरी या रेल्वे उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

१२ तासांच्या रेल्वे प्रवासासाठी १८ किंवा त्यापेक्षा जास्त तास लागत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर १० मिनिटांच्या अंतरासाठी ४० ते ५० मिनिटे लागत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी उत्साहाने घराकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचा हिरमोड झाला आहे. दुसरीकडे गावी जाण्यासाठी दादर, दिवा, कल्याण, ठाणे या रेल्वे स्थानकांवर तोबा गर्दी झाली आहे.

काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. “गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आज सरकारच्या अकार्यक्षमतेचा फटका बसला. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत केला जाईल, अशी ग्वाही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली होती. यासाठी चार वेळा महामार्गाचा पाहणी दौरा करूनसुद्धा गणेशोत्सवासाठी महामार्ग नीट बनत नसेल तर त्या दौऱ्यांचा आणि आश्वासनांचा काय उपयोग?,” असा सवाल त्यांनी केला आहे.

महामार्गावरही प्रचंड वाहतूककोंडी

मुंबई, पुण्यावरून एकाच वेळी गावाकडे जाणाऱ्यांनी गर्दी केल्याने पुणे, सातारा महामार्गावर, खंबाटकी घाटात व आनेवाडी टोलनाक्यावर वाहतूककोंडी झाल्याने वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे. आनेवाडी टोलनाक्यावर प्रचंड वाहतूककोंडी झाल्याने महामार्गावर कित्येक किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई, पुण्याकडून सातारा, सांगली, कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहनांची होणारी गर्दी पाहता, आनेवाडी व खेड शिवापूर टोलनाक्यावर अधिकच्या लेन सुरू करण्यात आल्या आहेत. शनिवार सायंकाळपासून महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे वाहतूककोंडीसोबतच गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांचीही कोंडी झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in