
भाईंंदर : मीरारोडमधील ‘मराठी-अमराठी’ वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि मनसे शहराध्यक्ष संदीप राणे एकाच व्यासपीठावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे मेहता यांनी राणे यांना केक भरवून शुभेच्छा दिल्या, तर दुसरीकडे काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन आणि मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी याच मुद्द्यावरून भाजपवर आणि मेहतांवर जोरदार निशाणा साधला.
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मीरारोडमध्ये सुरू झालेला वाद आता राज्याबाहेरही पोहोचला आहे. जोधपूर स्वीट्सच्या मालकाशी झालेल्या वादानंतर मनसैनिकांनी त्याला मारहाण केली, त्यावरून आमदार मेहतांनी मनसेवर टीका करत अमराठी व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला. या पार्श्वभूमीवर शहरात अमराठी आणि मराठी मोर्चे काढले गेले, मात्र प्रशासनाची भूमिका फक्त मराठी मोर्च्यांवरच कठोर असल्याचा आरोप झाला.
आ. नरेंद्र मेहता यांनी सुरुवातीपासून व्यापाऱ्यांच्या बाजूने उभं राहत मनसेवर टीका केली होती. मात्र राणे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मेहता स्वत: उपस्थित राहून राणेंना केक भरवताना दिसले. काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ठामपणे सांगितले. त्यांनी मेहतांना नाव न घेता टोला लगावला की, उपस्थित जनता केक खाण्यासाठी नव्हे, तर मराठीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी आली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी थेट इशाराच दिला की, मराठी माणसाच्या नादी लागाल, तर राजकारणात संपवू. त्याचबरोबर मुझफ्फर हुसेन यांचे मराठी भाषेतील भाषण आणि शिवरायांवरील प्रेम पाहून आपण त्यांचे 'फॅन' झाल्याचेही त्यांनी म्हटले.
मेहतांची सफाई
मेहतांनी भाषणात स्पष्ट केले की, मी मराठीचा विरोधक नाही. शहरातील सर्व धर्म-जातींनी आपल्याला साथ दिली असून वाढदिवसाला आलेल्या प्रत्येकाच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे. एकाने हिंदीत शुभेच्छा दिल्या म्हणून त्याचा वेगळा अर्थ लावू नये, असे ते म्हणाले.