मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरण

मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरण

पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा घोटाळा करणारा कर्जबुडव्या मेहुल चोक्सी याला मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.
Published on

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा घोटाळा करणारा कर्जबुडव्या मेहुल चोक्सी याला मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. २०२२ मध्ये उघडकीस आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने चोक्सीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हिरे व्यापारी मेहुल चोक्सी व त्याचा भाचा नीरव मोदी या दोघांनी १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

कॅनरा बँकेच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमशी संबंधित कर्ज घोटाळा प्रकरणात दंडाधिकारी न्यायालयाने चोक्सीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे ५५ कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याचे प्रकरण आहे. या महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) चोक्सीविरुद्ध वॉरंट जारी करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. केंद्रीय तपास यंत्रणेची विनंती मान्य करीत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. बी. ठाकूर यांनी अजामीनपात्र वॉरंट जारी केल्यामुळे मेहुल चोक्सीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्याला काही दिवसांपूर्वीच भारताच्या विनंतीवरून बेल्जीयम पोलिसांनी अटक केली होती.

सीबीआयने चोक्सीशी संबंध असलेल्या बेझेल ज्वेलरी इंडिया आणि गीतांजली जेम्स या कंपन्यांसह सात जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, कॅनरा बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनी एका कन्सोर्टियम करारांतर्गत बेझेल ज्वेलरीला ३० कोटी रुपये आणि २५ कोटी रुपये कार्यरत भांडवल सुविधा म्हणून मंजूर केली होती.

logo
marathi.freepressjournal.in