
मुंबईतील गोराई किनाऱ्यावर १९ जुलै रोजी ‘मेलन हेडेड व्हेल’ हा दुर्मीळ समुद्री प्राणी वाहून आलेला आढळला. १८ जुलै रोजी गोराई येथील किनाऱ्यावर हा प्राणी जिवंत अवस्थेत वाहून आला होता. त्यावेळी त्याला पुन्हा पाण्यात सोडण्यात आले होते; परंतु मंगळवार, १९ जुलै रोजी ‘मेलन हेडेड व्हेल’ या डॉल्फिनसदृश दिसणाऱ्या दुर्मीळ समुद्री सस्तन प्राण्याचा मृतदेह वाहून आला.
डॉल्फिनपेक्षा आकाराने थोडा मोठा असणारा हा समुद्री प्राणी म्हणजेच ‘मेलन हेडेड व्हेल’ सस्तन प्राणी खोल समुद्रात आढळून येतो. ब्लॅकफिश या कुळात हा प्राणी मोडतो. अरबी समुद्रात २५० ते ३०० मीटर खोलीपर्यंत हा प्राणी वास्तव्य करतो. या प्राण्याचा मृतदेह तपासणी आधीच पुरून टाकण्यात आल्याने वाहून येण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हवेच्या बदलामुळे, किंवा दिशा चुकल्यामुळे, किंवा आजारपणामुळे हा प्राणी वाहून आला असण्याची शक्यता मरिन लाईफच्या स्वयंसेवकांकडून वर्तवण्यात येत आहे.