दुरावलेल्या पत्नीसाठी पुरुषांनी केले पिंडदान; ‘वास्तव फाऊंडेशन’चा ‘नात्यांचे पिंडदान’ उपक्रम

वाळकेश्वर येथील बाणगंगा येथे एक अनोखा विधी पार पडला. पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पिंडदान करण्यात आले. यावेळी श्रद्धांजली दिली गेली ती मृत व्यक्तींना नव्हे, तर दुरावलेल्या, विभक्त पत्नींच्या नात्यांना.
दुरावलेल्या पत्नीसाठी पुरुषांनी केले पिंडदान; ‘वास्तव फाऊंडेशन’चा ‘नात्यांचे पिंडदान’ उपक्रम
Published on

मनोज रामकृष्णन / मुंबई

वाळकेश्वर येथील बाणगंगा येथे एक अनोखा विधी पार पडला. पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पिंडदान करण्यात आले. यावेळी श्रद्धांजली दिली गेली ती मृत व्यक्तींना नव्हे, तर दुरावलेल्या, विभक्त पत्नींच्या नात्यांना.

पितृपक्षातील दिवसात कुटुंबीय आपल्या मृत झालेल्या नातेवाईकांच्या आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करतात. पण या कार्यक्रमाला जमलेले पुरुष त्यांच्या दुरावलेल्या पत्नीच्या पिंडदानासाठी आले होते, ज्या महिलांनी पोटगीसाठी त्यांच्यावर खटला भरलेला आहे.

‘वास्तव फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात २७ पुरुषांनी अशा पिंडदान विधीत भाग घेतला.

वास्तव फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित देशपांडे म्हणाले, हिंदुस्थानी न्यायव्यवस्थेचा संथ वेग पुरुषांच्या मानसिक त्रासाला वाढवतो. त्यांना त्यांची पत्नी आणि मुले गमवावी लागतात आणि वर्षानुवर्षे खटल्यात अडकून राहावे लागते. काही पुरुष आत्महत्येचा मार्गही स्वीकारतात.

या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आणि पुरुषांना पुढे जाण्यासाठी आम्ही ‘नात्यांचे पिंडदान’ ही एक उपचारात्मक पद्धत सुरू केली आहे.

सायन येथील रहिवासी संदीप गुप्ता (नाव बदलले आहे) यांनी सांगितले, लग्नाच्या दोन महिन्यांत पत्नीने मला सोडले, घटस्फोट नाकारला आणि पोटगीसाठी खटला दाखल केला. १५ वर्षे कोर्टात फिरत होतो. या विधीमुळे मला मानसिक शांती मिळाली.

‘वास्तव’चा दावा आहे की, भारतीय पुरुषांसाठी कोणतीही स्वतंत्र समर्थन यंत्रणा अस्तित्वात नाही, जसे की महिलांसाठी महिला आयोग आहे. संस्थेने सांगितले की, २४% विवाहित पुरुषांच्या आत्महत्यांचे कारण वैवाहिक मतभेद आहेत.

विवाहातील संघर्ष केवळ कायदेशीर नसून, भावनिक आणि सामाजिक पातळीवरही परिणाम करणारा विषय आहे. स्त्रिया व पुरुष दोघांचेही प्रश्न समजून घेणे, आणि मानसिक आरोग्याला महत्त्व देणे हे वादातून आलेले मुद्दे आहेत.

अशा खटल्यांतून पुरुष आणि स्त्रिया दोघेही मानसिक त्रासातून जातात. १५ वर्षे चाललेले खटले हे न्यायालयीन व्यवस्थेच्या समस्येचे लक्षण आहे. दोष कोठे आहे तिथेच बोट ठेवा. जर खटला खोटा असेल तर तो न्यायालयाने सिद्ध करायचा आहे. केवळ स्त्रियांना दोष देणे योग्य नाही.

ऑड्री डिमेलो, संचालिका, ‘मजलिस’ संस्था

सामाजिक विश्लेषणात पुढे आलेले मुद्दे

  • भारतीय न्यायव्यवस्थेचा संथपणा पीडित पुरुष आणि महिलांना ताणत ठेवतो.

  • पुरुषांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते.

  • आणि एकांगी दृष्टिकोनामुळे समाजात लिंगाधारित द्वेषाची शक्यता निर्माण होते.

logo
marathi.freepressjournal.in