अडीचशे कोटींच्या मेफेड्रॉन प्रकरणातील १५वा आरोपी गजाआड; दुबईतील ड्रग तस्कर मोहम्मद सलीम मुंबई पोलिसांच्या ताब्यात

दुबईत राहून हस्तकांमार्फत अडीचशे कोटी रुपयांच्या मेफेड्रॉन ड्रगची मुंबईत तस्करी करणारा मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख या कुख्यात तस्कराला काल मुंबईत आणले गेले. आतापर्यंत त्याच्या टोळीतील एका महिलेसह एकूण पंधरा जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
अडीचशे कोटींच्या मेफेड्रॉन प्रकरणातील १५वा आरोपी गजाआड; दुबईतील ड्रग तस्कर मोहम्मद सलीम मुंबई पोलिसांच्या ताब्यात
अडीचशे कोटींच्या मेफेड्रॉन प्रकरणातील १५वा आरोपी गजाआड; दुबईतील ड्रग तस्कर मोहम्मद सलीम मुंबई पोलिसांच्या ताब्यात
Published on

मुंबई : दुबईत राहून हस्तकांमार्फत अडीचशे कोटी रुपयांच्या मेफेड्रॉन ड्रगची मुंबईत तस्करी करणारा मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख या कुख्यात तस्कराला काल मुंबईत आणले गेले. आतापर्यंत त्याच्या टोळीतील एका महिलेसह एकूण पंधरा जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

फेब्रुवारी २०२४ मध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुर्ला येथे परवीन बानो गुलाम शेख या महिलेला अटक करून तिच्याकडून ६४१ ग्रॅम वजनाचे बारा लाखांचे मेफेड्रॉन जप्त केले होते. त्या गुन्ह्याचा तपास करताना आरोपी परवीन शेख हिने ते मेफेड्रॉन दुबईतील मोहम्मद सलीम शेख याच्याशी संपर्क साधून त्याचा मुंबईतील हस्तक साजिद मोहम्मद याच्याकडून खरेदी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यावरून साजिद याच्या मीरा रोड येथील घरावर छापा घालून त्याला अटक करण्यात आली असता, त्याच्याकडे तीन किलो वजनाचे सहा कोटी रुपयांचे मेफेड्रॉन सापडले.

अधिक तपासात दुबईतील मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख याच्या संपर्कात राहून सांगली येथील मेफेड्रॉनच्या कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवणाऱ्या आणि तयार माल विकत घेणाऱ्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली. त्या कारखान्यात २५४ कोटींचे मेफेड्रॉन आढळले होते. त्या खरेदी विक्री प्रकरणातील दोन अंगडियांनाही अटक करण्यात आली. त्यानंतर परदेशात राहून अमली पदार्थ तयार करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या ताहेर सलीम डोला आणि मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला यांच्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पार पाडून दुबईतून भारतात आणून अटक करण्यात आली.

रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आलेल्या मोहम्मद सालीम मोहम्मद सुहेल शेख याला काही आठवड्यांपूर्वी संयुक्त अरब अमिरात येथे अटक करण्यात आली होती. बुधवारी त्याला मुंबईत आणून न्यायालयात हजर केले असता, त्याला ३० ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in